Nov 16, 2018

गुड मॉर्निंग

शहरातल्या आलीशान इमारतीतले,
अठराव्या मजल्यावरचे ते शेजारी.
भिंतीच्या अलीकडे - ती,
आणि पलीकडे  - तो.

कधी ती टाहो फोडून रडायची,
त्याला ते ठाऊकही नसायचे.
कधी तो चिडून चरफडायचा,
तिला त्याचा मागमूसही नसायचा.

सकाळी दोघे एकाच वेळी
कामासाठी घराबाहेर पडायचे.
चेह-यावर कृत्रिम हसू आणून,
एकमेकांना “गुड मॉर्निंग” म्हणायचे.

त्या दिवशी त्याचा वाढदिवस होता.
तिला काय, कुणालाच माहीत नव्हते.
आवडतो म्हणून त्याने शिरा केला.
फारच बिघडला. पण तिची मदत
मागण्याचे धाडस नाही झाले.

त्याच रात्री तिचा लाईट बल्ब फुटला.
स्टूल वापरूनही दिवा बदलण्याइतकी
उंच ती नव्हती. मग अंधारातच राहिली.
त्याची मदत मागण्याची शरम वाटली.
                     ***
तरीही दोघे रोज सकाळी एकमेकांना
न चुकता “गुड मॉर्निंग” म्हणतच राहिली.
नेमाने. “गुड मॉर्निंग" करता करता
अनेक वर्षे उलटली. 
                     ***
गेल्या वर्षी तो परदेशी गेला.
तब्बल सहा महिन्यांसाठी.
तिला काहीही न सांगताच.
“गुड मॉर्निंग” म्हणायला कुणी नव्हते,
एवढाच काय तो फरक तिला जाणवला.

तो परत आल्यानंतर तिची आई वारली.
अचानकच. कुठून तरी त्याला कळले,
पण “गुड मॉर्निंग” म्हणण्याखेरीज
त्याच्याकडे दुसरे शब्दच नव्हते.
                    ***
अन् त्या दोघांमधली ती जाडजूड भिंत,
जी रोज रात्री त्या दोघांचे कढत अश्रू पहायची,
त्यांचा एकाकीपणा निर्विकारपणे शोषायची,
ती तशीच होती, नि:स्तब्ध! गार गार सिमेंटची.
ती तरी काय करणार बिचारी? ती असो वा नसो,
एकत्र असूनही एकत्र नसणारी अनेक कुटुंबे
तिने आणि तिच्या बहिणींनी पाहिली होती.
ती बोलत असती, तर काय म्हणली असती?
“गुड मॉर्निंग,” की अजून काही?

No comments:

Post a Comment