Nov 10, 2018

जिवलगा

त्या दिवशी,
तारीख कोणती होती?
वार कोणता होता? 
वेळ काय होती? 
तू नाश्ता केला होतास का?
तू कपडे कोणते घातले होतेस? 

तू निघण्याआधी,
देवाची पूजा केली होतीस का?
आईला नमस्कार केला होतास का? 
बाबांना पेपर आणून दिला होतास का? 
मला शेवटचे काय बोलला होतास?
बाळाचा पापा घेतला होतास का?
घाईघाईत निघाला होतास का?

काहीच आठवत नाही ... 

आठवते ती फक्त 
मनाला झालेली जखम.
कुठेतरी फार खोलवर ... 
अचानक पोरके झाल्याची भावना.
तुझा तो निष्प्राण देह आणि
निरोप घ्यायची संधीही मिळाली नाही
ह्याचे दु:ख, राग, पश्चात्ताप ...
छप्पर डोक्यावर पडल्यावाणी वेदना, अन्, 
तुझ्याशिवायच आता जगावं लागणार 
ह्या कटू सत्याची झालेली जाणीव. 
आज अनेक वर्षे लोटली तरी 
ती वेदना तशीच आहे - चिरतरुण !
जणू काही, कालच सगळं घडलं होतं...

No comments:

Post a Comment