Nov 13, 2018

प्रवास

त्याच त्याच गोष्टींनी जीव घुसमटू लागला म्हणून नवीन अनुभव घ्यायला तो अमेरिकेत गेला. सुरुवातीला सारेच नवीन –भाषा, माणसे, संस्कृती, हवामान. मग काही वर्षे लोटली. नव्याची नवलाई संपली. सगळे तेच तेच दिसू लागले. माणसे सगळीकडे थोड्याफार फरकाने तशीच : कुणी काळी, कुणी पांढरी, कुणी उंच, कुणी बुटकी, कुणी दुष्ट, कुणी पुष्ट, कुणी बेरकी, कुणी सरकी. वेगवेगळ्या प्रकारच्या - पण कटकटी, मूर्खपणा, भेदभाव, स्वार्थीपणा, राजकारण. मग अमेरिकेचाही वीट येऊ लागला. हाच का तो परदेश, जो दहा वर्षांपूर्वी भन्नाट भारी वाटला होता? त्याचा स्वत:वरच विश्वास बसत नव्हता. पुन्हा देश बदलायचे स्वप्न तो पाहू लागला.

आता काय, तर म्हणे, चीन देशात जायचे. रोज रात्री कामानंतर चिनी भाषा शिकू लागला. चिनी मूव्हीज पाहू लागला. चिनी स्त्रियांबरोबर डेटींग करू लागला. चीनी पदार्थ “अरे वा, अरे वा,” करत ओरपू लागला. नॉनव्हेजचा सराव व्हावा म्हणून कधी कधी बागेतले कोळी, सरडे, गांडूळे वाफवून खाऊ लागला. अन् मग एके दिवशी एका जवळच्या चीनी मैत्रिणीने ब्रेक अप केला. तेंव्हापासून ह्याचा जणू अख्ख्या चीन देशाशीच ब्रेक अप झाला. "चीन" शब्द हनुवटीसाठीही वापरू नये असे त्याला वाटू लागले.

मग तो इटलीकडे वळाला. प्राचीन वास्तुकला त्याला मोहित पाडू लागल्या. सवड होईल तसे आठ-पंधरा दिवस सुट्टीत इटलीत जाऊ लागला. आताशा स्वप्नेही इटालियन भाषेत पडू लागली. सुंदर सुंदर चर्चेस्, निमुळते कॉबल स्ट्रीट, ओरिजिनल पिझा-पास्ता, वाईन, सारेच वेगळे आणि अफलातून सुंदर होते. कॅथोलिक व्हावे की काय, असेही त्याला वाटू लागले. तोच भारतातून निरोप आला : “आईची तब्येत फार बिघडली आहे.”  मग इटली राहिली बाजूला.

आईला भेटण्याचे वेध लागू लागले. कधी एकदा तिला पाहू, असे त्याला झाले. तातडीने तिकीट काढून गेला. आई फारच खंगली होती. आता किती दिवस राहील ह्याची शाश्वती नव्हती. मग आईची सेवा करू लागला. तेंव्हा वीस वर्षांपूर्वी सोडलेला भारत आता परदेश वाटू लागला होता. सारेच नवीन. जो तो मोबाईल वरून बोलत होता. ह्याच्याकडे मोबाईल नव्हता तर सारे त्याच्याकडे तो जणू चोर, गुन्हेगार असल्यासारखे पहात होते. सारीकडे भव्य दिव्य मॉल झाले होते. हिंदी सिनेमातली गाणी, त्यातील व्यक्तींची वेशभूषा, सारे पाश्चात्यच वाटत होते. कुठेतरी फार मोठी विसंगती वाटत होती. काही महिन्यांत आई वारली. मग भारतात असूनही कुठेतरी दूर दूर आहोत असे वाटू लागले.

“आता कोणता देश? कोणती भाषा? कोणता जॉब? कोणती गर्ल फ्रेंड?” असे विचार तो करू लागला. एक गोष्ट आजपर्यंत ध्यानात आली होती. कुठेही जा, सगळीकडे सगळ्या गोष्टी थोड्याफार प्रमाणात सारख्याच. त्याला जगायचाच कंटाळा येऊ लागला. काहीतरी नवीन हवेसे वाटू लागले. कुणी अनोळखी हाक मारत आहे, असे वाटू लागले. अनोळखी प्रदेश, भाषा, माणसं स्वप्नांत दिसू लागली. नवीन कोणती तरी कला शिकावी असे वाटू लागले. पण काय, कुठे, कसे, काहीच कळत नव्हते. मन कुठेच रमत नव्हते. नाटकात काम करावे की काय, असे वाटू लागले. खरं तर एव्हाना आयुष्याचेच नाट्य झाले होते. पण त्याची त्याला कल्पना नव्हती. पर्वा नव्हती. नवीन काही सापडेस्तोवर तो मायदेशीच राहून नाटकात बारीकसारीक भूमिका करू लागला. आवाज भारदस्त आणि रूप मनोहर असल्याने कामे मिळत गेली. हळू हळू त्याचा जम बसू लागला.

अचानक एक दिवस लक्षात आले की तो “हेच” कित्येक वर्षे शोधत होता. नवीन देश, नव्या भूमिका, नवे कपडे, देश, भाषा. सगळे आता कुठेही जास्त न फिरता करायला मिळणार होते. स्क्रिप्ट मनासारखे नसले तर ते लिहिण्याचीही मुभा होती. आणि आतापर्यंत पुष्कळ भाषा शिकल्याने, हवे ते कुठेही करता येणार होते. काहीतरी शोधायला बाह्य जगात प्रवास करण्याची गरज आता संपली होती कारण त्याचा अंतर्गत फार मोठा प्रवास सुरु झाला होता. कल्पनेच्या विश्वात. त्या प्रवासाला भाषेची, देशाची, भावनांची मर्यादा नव्हती. तोच तोच पणा नष्ट करणे त्याच्याच हातात होते. त्या प्रवासाला सुरुवात झाली होती आणि शेवट अनंताकडेच होता.

No comments:

Post a Comment