Nov 2, 2018

सहानुभूती

जन्मापासूनच नको एवढी होती.
कालांतराने ती बोथट होऊ लागली.
रोज कितीतरी बलात्कार, चो-या, दरोडे,
खून, मारामा-या, भ्रष्टाचार, लाचलुचपत,
सत्तेसाठी, प्रेट्रोलसाठी युद्धे, जातीभेद,
धर्माच्या नावाखाली युद्धे, हिंसाचार,
आत्महत्या, अपघात, रोगराई, प्रदूषण,
गरिबी, दुष्काळ, अतिवृष्टी, महागाई,
प्राण्यांची, माणसांची आणि अरण्यांची कत्तल,
मजूरांच्या हाल अपेष्टा, वगैरे, वगैरे, वगैरे ...
सारे कसे आपण सहजपणे सकाळच्या
बातम्यांमध्ये चहाच्या चार घोटांसोबत संपवतो.
इलाजच नसतो. सगळेच अनाकलनीय असते.
अन् आपल्या आवाक्याबाहेर गेलेले असते.
एक दिवस असा येतो, की आपली सहानुभूती
अपुरी पडते. अन् ती केवळ असून काहीच
उपयोग होत नसतो. तसे जर असते तर
कवितांवरच सारे जग चालले असते.
आपण मुंगीच्या पावलाने चालत असतो.
आणि जग कुठच्या कुठे बेभान धावत असते.
मग ती सहानुभूती नकोशी वाटते.
तिचा त्रास होऊ लागतो. ती छळू लागते.
तिचा पाठलाग सहन होत नाही.
मग आपण फार दूर दूर जातो.
नातलगांपासून दूर. समाजापासून दूर.
तिच्यापासून दूर. स्वत:पासून दूरच दूर.
कशाचाच कसलाच फरक आपल्याला पडत नाही.
कारण आपली सहानुभूतीच बोथट झालेली असते.
मग एखाद्या दगडापेक्षाही कित्येक पटींनी जास्त
स्वार्थी आयुष्य आपण जगतो. इलाजच नसतो.
एव्हाना ती सहानुभूती मरून गेलेली असते.
ती आपल्याला सोडून जाते? की आपण तिला ?
एखाद्या जुन्या प्रेयसीला म्हातारी झाल्यावर
सोडून द्यावे तसे आपण तिला टाकून देतो.
आणि मग आपली एक दुष्ट चेटकीण झालेली असते.

No comments:

Post a Comment