Aug 8, 2019

आता तरी जादू कर ना

एकदाच सांग मला
स्वर्ग कसा कुठे देवा?
कोण आई, कोण बाबा?
कोण तिथे ताई, दादा?

स्वर्गातले आई बाबा
चॉक्लेट मला देतील का?
तोंड नाही धुतले तरी
दूध मला देतील का?

स्वर्गातल्या शाळेमध्ये
मित्र मला देशील का?
मोबाईल टॅब्लेट त्याच्याकडचा
दूर फेकून देशील का?

मित्र हवा मला एक
गमतीदार स्वभावाचा
त्याच्यासंगे काही तास
क्षणार्धात जातील देवा

मैत्रीणही दे रे देवा
जीव मला लावणारी
तिला देईन माझ्याकडच्या
गोष्टी गंमती राखण्याला

आईबाबा म्हणती मला
थोडा धीर काढ बाळा
देवबाप्पा येईस्तोवर
त्याचे गाणे गाऊ बाळा

ये रे देवा, ये रे देवा,
मला लवकर घेऊन जा ना
अंत नाही माझ्या दुखण्या
आता तरी जादू कर ना

No comments:

Post a Comment