Aug 15, 2019

आपली माणसं आणि तिकडे

परदेशातून भारतात गेल्यावर एक प्रश्न हमखास विचारला जातो : “तिकडे आपली माणसं आहेत का गं ?” ह्या वाक्यातील दोन गोष्टींचे अभिप्रेत अर्थ आज पाहूयात : “तिकडे” आणि “आपली माणसं”. केवळ मराठी भाषा येऊन हे अर्थ कळणार नाहीत. त्यासाठी एक विशिष्ट प्रकारची मानसिकता आणि पार्श्वभूमी असणे अत्यावश्यक आहे.

"तिकडे" ह्या शब्दाचा अर्थ बहुतांशी वेळा प्रश्न विचारणा-या व्यक्तीच्या मनातली अमेरिका हाच असतो. म्हणजे बरेचदा न्युयॉर्क किंवा कॅलिफोर्निया. तिथे त्यांच्या ओळखीतला कुणीतरी कधीतरी गेलेला असतो. कंप्युटर इंजिनीअर म्हणून, नोकरीनिमित्त, शिक्षणासाठी किंवा शिक्षक म्हणून. “तिकडे सगळे भारतीय पदार्थ मिळतात” ह्याचा अर्थ कॅलिफोर्नियातील काही गावांत काही भारतीय पदार्थ मिळतात असा असतो. मग तुम्ही जपान किंवा कोरियातून जरी परत गेला असाल तरी “तिकडे” चा अर्थ अमेरिकातला एक बारीक तुकडा असाच असतो. ह्या खेपेस कॅनडातून पुण्यात गेले तेंव्हा मला एक नवीनच पण मजेशीर प्रश्न विचारला गेला : “तिकडे चितळ्यांचे दूध मिळते का गं ?”

आता “आपली माणसं” ह्या शब्दप्रयोगाकडे वळूयात. प्रश्न विचारणा-याच्या पार्श्वभूमीनुसार “आपली” ह्या शब्दाचा अर्थ आपणच ओळखून उत्तर द्यायचं असतं. ह्या आपलीचे अनेक अर्थ असू शकतात: भारतीय, मराठा, हिंदू, मुस्लीम, ब्राह्मण, मराठी भाषिक, इत्यादी, इत्यादी. ह्या लोकांच्या शब्दकोशानुसार बहुतांशी वेळा माणसे आपली आहेत की नाही हे त्यांच्या जन्मस्थानावरून , नावाआडनावांवरून, रंग, धर्म, आर्थिक सुबत्ता, इ. गोष्टींवरून ठरत असते. आणि मग आपली माणसे आहेत असे सांगितल्यावर प्रश्न विचारणा-यांना कमालीचे हायसे वाटते. जणू काही माझ्याविषयीची काळजीच संपते. जणू काही आता मला परदेशी कोणतीच अडचण भासणार नाही ह्याची त्यांना ग्वाही वाटते. आणि आपली माणसे नाहीत असे जर सांगितले तर त्यांना माझी चिंताच वाटू लागते. जणू काही मी एका निर्जन अरण्यात अन्नपाण्याविना काळ कंठत आहे असे त्यांना वाटते. अशावेळेस  "बिच्चारी!" असे मनात म्हणून ते दयेने माझ्याकडे बघतात.

लोकहो, होय, मी एकविसाव्या शतकातले आणि मोठ्या शहरांमधलेच अनुभव सांगत आहे. अगदी उच्चशिक्षित आणि अनपढ, कुणीही मला हाच प्रश्न विचारतात : “तिकडे आपली माणसे आहेत का गं ?” काही वेळा प्रश्न विचारणारा कुतूहल म्हणून हा प्रश्न विचारतो असे वरवर तरी वाटते. पण बरेचदा वरवर साधे दिसणारे हे प्रश्न रेसिस्ट असतात. त्यावेळेस हा प्रश्न विचारणारा माणूसच त्या वेळेपुरता “आपला” नाही असे क्षणभर वाटल्यावाचून रहात नाही.

No comments:

Post a Comment