May 13, 2020

त्याचे म्हणणे


प्रकाश पडता मी का उठावे?
अंधार पडता मी का निजावे?
अंगास माझ्या दुर्गंध नसता  
साबु जलाने मी का धुवावे?

वेळीस का मी हररोज खावे?
स्वयंपाकपाणी मी का करावे? 
अंथरुण पुन्हा उलथावयाला
उगाच का ते आवरून घ्यावे?  

झालो जरी मी बाप्या तरीही
वृथा कशाला गृहस्थ व्हावे?
आनंदी माझ्या विश्वात असता
स्वातंत्र्य माझे मी का गमावे?

रुढी प्रथांना मी का धरावे?
स्वप्नांस माझ्या मी का दडावे?
सुखात असता अजाण मार्गी
संसारी सांगा मी का पडावे?

अध्यात ना मी मध्यात ना मी
येऊ नका अन् माझ्या घरीही
लुडबुड तुमची मजला नको ती
तुमच्या घरी भांडी घासा तुम्ही ती

No comments:

Post a Comment