Mar 10, 2020

राम तुझ्या मनातला

होता दयेचा पाझर अंत:करणात तुझ्या
होता करुणेचा झरा वर्तनात सदा तुझ्या
परि आज कसा सूर्य तुझ्या हृदयी लोपला?
असा कसा रे झोपला राम तुझ्या मनातला?

दिसेना का रक्तपात सारा समाज मातला
दिसेना का अंध:कार सभोवती पसरला
द्वेषभाव कशामुळे तुझ्या मनात उठला?
असा कसा रे झोपला राम तुझ्या मनातला?

अन्यायाचा तिटकारा नाही येत का रे तुला?
बंधुभाव कशामुळे तुझ्या जगी हरवला?
सारे आयुष्य जगून काय उपयोग झाला?
असा कसा रे झोपला राम तुझ्या मनातला?

सूर्य प्रीतीचा उगवूदे फार उशीर न झाला
राम उठूदे मनीचा दु:ख दुज्याचे दावाया
धीर धरी संकटात सत्य दाखवेल मार्ग
नको झोपवू कधीही राम तुझ्या मनातला 

No comments:

Post a Comment