Sep 2, 2019

सरिते

वाहतेस दूर किती सागरास भेटण्या
धावतेस एकटीच ध्येय तुझे गाठण्या

जन्म घेतलास कुशीत नील भव्य पर्वता
सोडलेस पितृगृहा विश्वाच्या कल्याणा

फेन दुग्ध वस्त्रधारी श्वेत कमल धारिणी
चपळ किती वाहतेस नील विष्णु रुपिणी

जलद कधी संथ कधी वक्र कधी कोसळशी
बांध कितीक घातले तरी पुढेच वाहशी 

नीर देऊनी जगास अमृत तू पाजशी
मीन मकर वृक्ष वेल मानवास पोसशी

नाविकास साथ तुझी मार्ग पुढे कंठण्या
जगजीवन हे अशक्य वाहिनी तुझ्याविना !

धावतेस भेटण्यास अर्णवास तू जरी 
बरसतेस प्रेम तुझे वाटेवर भूवरी

भेटतेस ज्या क्षणी सागरास, हे नदि, 
मधुर नितळ नीर तुझे क्षाराने मळविशी

त्यागाची देवी तू, उपकारांची माऊली
प्रीत तुझी थोर खरी सा-यांनी पूजावी

No comments:

Post a Comment