Sep 15, 2019

आजोळचे देवघर

किती अचानक जाते मन आजोळच्या वाटे
नाही चाहूल कसली सारे नकळत घडे !

झुंजुमुंजु होण्याचीही आता वाट ना बघते
उतावीळ मन माझे मला आजीकडे नेते

उष:काल झाला नाही तोच गंध मला येई
ओल्या मातीच्या अंगणी फुले प्राजक्त अंथरी

डोले तुळस अंगणी दारी आजीची रांगोळी
तिच्या सुबक रूपाला लाजे कृष्णाची कमळी

मधुमालती, शेवंती, टपोरे ते गुलाबही
देवपूजेच्या तबकी त्यांचे सर्वस्व अर्पिती

देवघरी उजळती वाती समईच्या मुखी
सारे शरीर जाळुनी देवा प्रकाश पाडती

धूप, चंदन, कर्पूर दरवळ दाही दिशां
दाह देऊन स्वत:स परिमळ देवघरी

गावातल्या घरी दारी मन थोडे हरवते
साध्यासुध्या गोष्टींचेही मनी छायाचित्र दिसे

सारे विश्व बदलते, असे कुणीतरी म्हणे... 
आजोळचे देवघर मनी तसेच राहते 

No comments:

Post a Comment