Mar 28, 2019

देशील साथ का तरीही?

देशील साथ का तरीही
त्या अनवट वाटेवरती ?  धृ.

नसतील गुलाब फुले अन
नसतील रेशमी वस्त्रे 
नसतील दास नि दासी
ना सुंदर घर सुखसोयी  १.

कधी वणवण रणरण उन
कधी खाण्या भाकर पाणी
कधी लज्जा कधी अपमान
ना मानमरातब आणि  २.

बोलेन कधी प्रेमाने
वा मौन कधी रागाने
कधी माझा मीच नसेन
असतानाही हरवेन  ३.

त्या विचित्र संसारात
कधी जीव घाबरा होईल
मायेचे कुणी नसताना
एकांत तुला खाईल  ४.

ते वेडा म्हणती मजला
व्यवहार कळेना कवीला
मज ध्यास नवा हररोज
अन अनंत आशा वेड्या ५.

असतील काहीशा कविता
अन सुखदु:खाची गाणी
फुलतील फुले अश्रूंची
कधी आशेच्या झाडावर  ६. 

No comments:

Post a Comment