Mar 21, 2019

ध्येय

हृदयामध्ये खोल कुठेसे त्याचे घर एकटे
दारी त्याच्या जाता जाता अनंत काटेकुटे

हिरवळ नाही, झरा कोठला? वाळूचे टेकडे
फसव्या वाटा पुढे ठाकती अंधारी वळणे

खाच नि खळगे जिकडे तिकडे चालावे कोठून?
उमेद सुटते, मार्ग ना मिळे, पोचावे कोठून?

इकडे जावे खोल दरीत पुन्हा न येणे वरती 
तिकडे जावे दलदल फसवी रानफूलांखाली

कातरवेळी घुबडे काळी घुं घुं घुत्कारती 
रात्र भयंकर हिंस्र श्वापदे किंकाळी फोडती

पहाटवेळी सुसाट वारा अंगाला झोम्बतो
ध्येयासाठी मार्ग कंठता देह थकुनी जातो

कधी फिरावे माघारी तर जीव घाबरा होतो 
काट्यांवरती जाण्याचाही सराव का मग होतो?

ध्येयासाठी झपाटुनी तो केला अट्टाहास
प्रेम आमुचे ध्येयावर अन श्रद्धा ध्येयावर
                        ***
बहु श्रमाने दिसले आजि ज्याचा होता ध्यास
ध्येय गाठता समाधान ना, रिक्त मनाला बोच

नवीन काही खुणावते मग हवे वाटते नवे
एक संपण्याआधी दुजाची मनात नौबत झडे !

No comments:

Post a Comment