Nov 30, 2017

चार दिवस चार कविता- भाग ४ (समाप्ति)


माझ्या साहित्यप्रेमी मित्रमैत्रीणींनो,

आज "चार दिवस चार कविता" ह्या सदरातील माझा शेवटचा दिवस. आज मी तुम्हाला काही वैयक्तिक अनुभव सांगणार आहे. सुरुवात माझ्या लहानपणापासूनच करावी लागेल. मी जेंव्हा विमलाबाई गरवारे शाळेत होते तेंव्हा मला मराठी आणि भूगोल ह्या दोन विषयांची विशेष भीती वाटायची. त्यावेळेस मला मराठीच्या पेपराच्या आधी मदत करायला मुग्धा आणि तिची आई (मंगला काकू) ह्या दोघी धावून यायच्या. कितीतरी वेळ मी मुग्धाकडे मराठीचा अभ्यास करायला जायची. तरीही मराठीची परीक्षा जवळ आली की छातीत धडधडायाचे. कधी झोपही उडायची. क्वचित् कधी मानसिक ताणाने उलट्याही व्हायच्या. त्यावेळेस मात्र माझी मोठी बहीण कल्याणी मला खूप मदत करायची. विशेषत: कवितेच्या अभ्यासासाठी. मुग्धा, मंगला काकू आणि कल्याणी ह्या तिघींच्या अनेक प्रयत्नांनीच मी परीक्षेत पास व्हायचे.

आज ह्या गोष्टीला इतकी वर्षे उलटली तरी अजूनही कधीकधी रात्री स्वप्न पडते की ...माझा मराठीचा पेपर आहे. आणि "फुटक्या बुरुजाची कथा" किंवा "एका मातेचे आत्मवृत्त" किंवा "करावे तसे भरावे" किंवा "फाटक्या नोटेचा प्रवास," अशा काहीशा विषयावर निबंध लिहायचा असतो. आणि मग मात्र मला दरदरून घाम फुटतो. काहीच लिहायला सुचत नाही. वरील विषयांपैकी कोणता विषय जास्त जिव्हाळ्याचा वाटतोय तेच आधी कळत नाही. फुटका बुरुज, की एक माता ? फाटकी नोट की करावे तसे भरावे ? मनाची इतकी चलबिचल होते म्हणून सांगू ! शेवटी असे काहीसे सुचते की : एका मातेला फुटक्या बुरुजावर एक फाटकी नोट सापडली. ती तिने एका साधूला दान केली. मग "करावे तसे भरावे" ह्या न्यायाने तिला खूप सारे पुण्य मिळाले. अशी ही माझी गोष्ट तीन ओळींतच संपते. मग पुढे काय ? निबंध तर पानभर लिहायचा असतो. मी हताश होते. त्यावेळेस मी मुग्धा, मंगला काकू आणि कल्याणी ह्या त्रिमूर्तींची आठवण काढूनच चार पाच ओळी कशाबशा खरडते...स्वप्नातच...आणि तेवढ्यात घंटा वाजते. वेळ संपते. लगेच रिझल्ट लागतो आणि मी नापास झालेली असते... असे हे विचित्र स्वप्न आजवर मला कित्येकदा पडले आहे. अजूनही पडते. कुठेतरी मनात खोलवर, विशेषत: इतरांनी सुचवलेल्या विषयांवर, निबंध लिहिण्याची मला अजूनही खूप भीती वाटते. अगदी arranged marriage ची कशी भीती वाटायची तशीच. इतरांनी सुचवलेला नवरा करणे जसे मला अवघड वाटले, तसेच इतरांनी सुचवलेल्या विषयावर निबंध लिहिणेही अवघडच होते, अजूनही आहे !

मला आजही आठवते. एकदा मराठीच्या परीक्षेच्या आदल्या रात्री अगदी बारा वाजायच्या सुमारास कल्याणीने मला खालील कविता समजावली होती:

दास डोंगरी राहतो
साता समुद्रा वाहतो
घोंगावून लक्ष वारे
दुर्ग दुर्ग हादरतो

काही केल्या ती कविता मला समजतच नव्हती. मी तिला प्रश्न विचारत होते: "कोण हा दास ? तो डोंगरातच का राहतो ? आणि राहत असेल तर त्याचा दुस-या वाक्याशी काय संबध ? दासामुळेच सात समुद्र हलतात का? इ. इ." माझ्या प्रश्नांची उत्तरे देता देता कल्याणी बिचारी थकून जायची. त्यातून तिने मला ह्या कवितेत "दास म्हणजे रामदास," अशी काही महत्वाची गोष्ट सांगितल्यावर मला वरील कवितेतील दुर्गादुर्गांसारखे हादरायलाच व्हायचे, कारण मला जे स्पष्ट लिहीले नाही ते ओळखायचे कसे ते अजिबात कळायचे नाही.

शाळेत कवितांचा अभ्यास करताना बाईंना उमजलेला कवितेचा अर्थ समजून घेताना नाकी नऊ यायचे. त्यातून शाळेत प्रश्न असे विचारले जायचे की "अमुकतमुक कवितेत कविला काय सुचवायचे आहे?" मग झाली का पंचाईत ! असे वाटायचे की पाठ्यपुस्तकातील प्रत्येक कवितेच्या प्रत्येक कविच्या घरी जाऊन एकदाचे त्यालाच विचारावे की, "काय हो, अमुकतमुक कवितेत तुम्हाला नक्की काय सुचवायचे होते? आणि मग जर तसे सुचवायचे असेल तर ते स्पष्टच तसेच का नाही सांगितले?"

उदाहरणार्थ, "न हे नयन, पाकळ्या उमलल्या सरोजातिल," असे काहीसे संदिग्ध लिहून कविला काय साधायचे असते ? खरं तर वरील वाक्यात दोन असंबंधित सुटीसुटी वाक्ये एकाच ओळीत लिहून कविने वाचकाला कोड्यात टाकायचा प्रयत्न केला आहे.
१. हे डोळे नाही आहेत, हे झाले पहिले वाक्य.
२. कमळाच्या पाकळ्या उमलल्या आहेत, हे दुसरे वाक्य.
असे परीक्षेच्या पेपर मध्ये लिहीले तर मराठीच्या बाई ओरडायच्या आणि म्हणायच्या, "कविला असे म्हणायचे होते की एका स्त्रीचे डोळे उमललेल्या कमळाच्या पाकळ्यांसारखे होते."
आता मलाच सांगा, "न हे नयन, पाकळ्या उमलल्या सरोजातिल" ह्या वाक्यात अचानक "एक स्त्री" कुठून आली ? बाईंच्या म्हणण्याप्रमाणे समजा आली असे मानूयात. पण वाचकहो, जर तुम्ही पुरुष असाल तर मला सांगा, जिचे डोळे उमललेल्या कमळाच्या पाकळ्यांसारखे आहेत अशा एका तरी स्त्रीकडे तुम्ही ढुंकून तरी पहाल का? शक्यच नाही ! मग कविला असे म्हणायचे होते असे बाईंनाच वाटत असेल, कविला नाही. अशी मी समजूत करून घ्यायचे.

थोडक्यात काय, तर शाळेत कविता शिकणे हे माझ्यासाठी फारच अवघड काम होते. कारण अनेक कवितांत जे आहे ते "ते नाहीये ", आणि जे नाहीये ते "ते आहे" असे नानाविध मार्गांनी सांगितले जायचे. उदाहरणार्थ: केर हा केर नसून वारा असतो आणि वारा हा वारा नसून केर असतो. मग काढायाचा काय, केर की वारा ? ह्या गोंधळामुळेच मी साहित्य, कविता ह्यांपासून जरा दूरच राहू लागले. कारण तेंव्हा "चंद्र हा चंद्रच असतो. स्त्रीचे मुख हे तिचे मुखच असते. ह्या दोघांचा काहीही संबंध नसतो. आणि कमळ हे एक फूल असते. डोळे हा शरीराचा एक अवयव असतो. त्यामुळेच चंद्रमुखी, कमलनयन हे शब्द निरर्थक आहेत," अशा कृष्णधवल विचारसरणीची मी होते. मग साहित्यापासून जरा लांबलांबच अशी अनेक वर्षे गेली. आपण बरे आणि आपला मार्ग बरा म्हणून मी गणित, फिजिक्स अशा सोप्प्या विषयांचा अभ्यास करू लागले.

माझ्यात आमूलाग्र बदल होऊ लागला तो सुमारे एका वर्षापूर्वी. तोही बदल कवितेच्या संदर्भातच आहे. लहानपणापासून अनेक कविता कानावर पडल्या असल्या तरी कवितेचे माझे "प्रेमाचे" नाते जडले ते गेल्या वर्षी आई आजारी पडल्यानंतरच. पुढे आई वारली. मग माझे भावविश्वच जणू हादरले ! भावनांचे पूर येऊ लागले. एक वेळ अशी आली की आपल्याला कोणीच समजू शकणार नाही असे वाटू लागले. त्यावेळेस मनातले बरेवाईट विचार कागदावर उतरवू लागले. त्या विचारांच्या कविता बनू लागल्या. जेंव्हा खूप दु:ख, होतं, खूप प्रेम होतं, किंवा एखादी भावना खूप तीव्रतेने होते तेंव्हा जर तुम्ही साक्षर असाल तर त्या भावनांच्या मनांत कविताच होतात. त्या फक्त आपल्याला कागदावर लिहायच्या असतात. हे असे होत असेल कारण कदाचित् अशा वेळी आपणच आपल्याला ओळखत नसू. म्हणजे आपल्याला जसे आपण वाटत असतो तसे आपण नसतोच. जे आहे ते "ते" नाही आहे, असे वाटल्यावर कविताच होतात. विश्वास ठेवा माझ्यावर. मी स्वानुभवाने सांगत आहे. आई वारल्यानंतर कविता ही माझी अगदी जवळची मैत्रीण बनली. म्हणजे तुम्हाला कदाचित् वाटेल की मी तेंव्हापासून फार कविता वाचू वगैरे लागले ...तर तसे अजिबातच नाही. पण तेंव्हापासून मला हव्या त्या विषयावर कविता करण्याचा प्रयत्न करू लागले. म्हणजे त्या आपोआपच होऊ लागल्या. इतरांच्या कवितांचे गर्भितार्थ समजून घेण्यापेक्षा कधी कधी स्वत: कविता करणे आणि इतरांना त्या समजून घेण्याचे अवघड काम देणे, हे सोपे वाटू लागले.

माझ्या कविता काही फार महान वगैरे नाहीत. पुष्कळशा वाचण्यासारख्याही नसतील. पण त्या माझ्या आहेत. ओबडधोबड, कंटाळवाण्या, बोजड असल्या तरी त्या माझ्या आहेत. त्या मला प्रकट करतात. त्या मला समजून घेतात. त्या माझे विचार मांडतात. आज त्या माझ्या जीवाभावाच्या मैत्रिणी बनल्या आहेत आणि त्या मला मार्गदर्शन करतात, माझ्या भावंनाना वाट देतात. तुम्हाला आश्चर्य वाटेल की श्रेष्ठ कविंच्या सुंदर सुंदर कवितांपेक्षा मला स्वत:च्या कवितांचा कसा काय आधार वाटतो म्हणून. तर गोष्ट अगदी साधी सोप्पी आहे. महान कविंच्या कविता सुंदर जरूर असतात आणि त्या जवळच्या वाटूही शकतात पण त्या "आपल्या" नसतात. जसे माधुरी दीक्षित गोड लावण्यवती जणू अप्सराच वाटते, पण ती आपली नसते. चित्रपटातल्या नायक नायिकेचे प्रेम उत्कट प्रशंसनीय नक्कीच वाटू शकते. पण तो आपला अनुभव नसतो. आपल्या अनुभवासाठी आपल्याला स्वत:लाच प्रेमात पडावे लागते; त्यात झोकून द्यावे लागते. किशोरी अमोणकर, कुमार गंधर्व ह्यांचे गाणे अफलातून सुंदर जरूर असते, पण आपल्या स्वत:च्या बाथरूममध्ये हंबरण्याने आपल्याला जो आनंद मिळतो तो त्यात नाही. सुंदर सुंदर देशातल्या निसर्गदृश्यांचे फोटो पाहून आनंद नक्की होतो. पण तिथे जाऊन ते अनुभवायाला मिळण्यात जी मजा मिळते ती कोणत्याच फोटोत नसते. त्यामुळेच तर आपल्यापैकी कुणीही फार अदभूत् गुणवान व्यक्ती नसले तरी आपल्याला आपली आई, आपले वडील, आपली मुले, आपला नवरा, आपली बायको, आपला प्रियकर, आपली प्रेयसी, इत्यादी जास्त सुंदर व गुणवान् वाटतात, कारण ते "आपले" असतात. म्हणूनच तर सावरकरांनी म्हटले आहे:

नभी नक्षत्रे बहुत, एक परि प्यारा
मज भरतभूमिचा तारा
प्रासाद इथे रम्य, परि मज भारी
आईची झोपडी प्यारी

तर सांगायचा मुद्दा हा, की अशा ह्या माझ्या कवितेने मला अवघड प्रसंगी सांभाळले. अजूनही सांभाळत आहे. जेंव्हा कोणत्याही मित्रमैत्रिणीला माझ्यासाठी वेळ नव्हता असे मला वाटत होते तेंव्हा ती माझ्यासाठी तत्परतेने धावून आली. त्यामुळे मी तिची शतश: ऋणी आहे.

माझ्या कविताप्रेमी मित्रमैत्रीणींनो, मी आज आपल्या सर्वांना असे आव्हान करते की आपले विचार कवितेत मांडूयात, आपल्या भावना प्रकट करूयात. भावनांचे लोणचे आणि मुरांबा घालणे आता पुरे झाले ! त्यांची छानशी झुळुझुळु वाहणारी नदी बनुद्या किंवा कोसळणारा धबधबा बनुद्या . यमक, वृत्त, छंद, भाषा, सोंदर्य ह्यांची भीती न बाळगता शब्दांच्या समुद्रात बेधडक उडी मारुयात. अगदी कुणाचीही पर्वा न करता ! पोहायला येते की नाही हे पहायला आधी पाण्यात उडी तर मारावी लागणारच ना ? आणि मला खात्री आहे की आपल्या सर्वांना छान कविता करता येतील. अगदी उत्तम नसतील तरी त्या आपल्याला आनंद देऊन जातील, कारण त्या आपल्या स्वत:च्या असतील. लोकांची जास्त पर्वा करू नका. लोक काय फार फार तर थट्टा करतील, दुर्लक्ष करतील, किंवा हसतील. पण कुणीतरी म्हटलेच आहे ना: "बोला हवे ते, मला काय त्याचे? पुरे जाणितो मीच माझे बल!"

"चार दिवस चार कविता" ह्या सदरात तुमचा निरोप घ्यायची वेळ आता जवळ आली आहे. गेले चार दिवस माझे छान आनंदात गेले आणि मी जे काही लिहीले ते तुम्ही कौतुकाने वाचल्याबद्दल, तुमच्या प्रतिसादाबद्दल आणि प्रतिक्रियांबद्दल मी तुमची आभारी आहे. ह्या चार दिवसांच्या माझ्या प्रयत्नांनंतर तुमच्या पैकी एकाला जरी माझ्यामुळे स्वत:ला कविता लिहिण्याची स्फूर्ती मिळाली तरी माझा हेतू साध्य झाला, असे मला वाटेल. आणि हो, आपल्या लिखाणाला वाचक असावा असे सर्वांनाच वाटते. जर तुम्हाला कुणी वाचक भेटला नाही, तर बिनधास्त मला लिहा. मी अगदी प्रेमाने तुमचे लिखाण वाचेन. समजून घेईन.
तुमची शब्दप्रेमी,
रत्नधा

आज दोन कविता तुम्हाला सादर करत आहे.

१. तांबे ह्यांची ही कविता एकदम "cute" आहे. मला ती गुणगुणायला फार आवडते. शब्दांची लय, मांडणी, निवड, निष्पापपणा, नैसर्गिकता, सारेच फार फार आवडते.

हे कोण गे आई ?

नदीच्या शेजारी | गडाच्या खिंडारी
झाडांच्या ओळींत | वेळूंच्या जाळीत
दिवसा दुपारी | जांभळी अंधारी
मोडके देऊळ | त्यावरी पिंपळ
कोण गे त्या ठायी | रहाते गे आई? १

चिंचांच्या शेंड्यांना | वडाच्या दाढ्यांना
ओढोनी हालवी | कोण गे पालवी ?
कोण गे जोराने | मोठ्याने मोठ्याने
शीळ गे वाजवी ? पाखरा लाजवी ?
सारखी किती वेळ | ऐकू ये ते शीळ २

वाळली सोनेरी | पानें गे चौफेरी
मंडळ धरोनी | नाचती ऐकोनी !
किती मी पाहीले | इतकेची देखिले
झाडांच्या साउल्या | नदींत कापल्या !
हाका मी मारिल्या | वाकोल्या ऐकिल्या ३

उरांत धडधडे | धावता मी पडे
पळालो तेथून | कोण ये मागून ? ४

कवि : भा.रा.तांबे (१९०७)

२. मला आवडतेस

तुझी लाडीगोडी भाळते
थट्टामस्करीही आवडते
कविते, मला तू
फारच आवडतेस

तुझा नखरा, तुझा नाद
तुझा दर्द, शुद्ध भाव
शृंगार, बेशरमपणा
सारे कसे गोड वाटते
कविते, मला तू
भारी सुंदर वाटतेस

अलंकारांनी नटलीस
तर लई गोड दिसतेस
सजलीसवरली नाहीस
तरी मोहक तू असतेस

यमकछंदाने नक्कीच
गोजिरी तू दिसतेस
मुक्तछंद राज्यातही
पट्टराणी शोभतेस

शुद्धभावांची तू
नाजूकवेल
मन ज्याला त्याला
पाडीशी भुरळ

दुजाला अलगद
तुझ्या विश्वी नेतेस
मोहरून टाकतेस
मने जुळवतेस
कविते, मला तू
फारच आवडतेस

शब्दशस्त्राने कधी
खंजीर खुपसतेस
लाडीगोडीने कधी
प्रेमात पाडवतेस

सामर्थ्यशाली तू
मनमोहिनी तू
कविते, मला तू
फारच आवडतेस

-रत्नधा (२५ नोव्हेंबर २०१७)