Nov 30, 2017

चार दिवस चार कविता- भाग १

"चार दिवस चार कविता" ह्या सदरात मला बोलावल्याबद्दल सर्वप्रथम अनुजाला आणि हिमानीलाही धन्यवाद ! तर ओळीने चार दिवस तुमचे मनोरंजन करण्याची दुर्मिळ संधी मला प्राप्त झाली आहे; त्याबद्दल मी आभारी आहे. अशी आशा करते की, माझ्या लिखाणामुळे तुम्हाला फार कंटाळा येणार नाही. आलाच तरी चारच दिवसांत तुमची सुटका होईल ! आजच्या दिवसाची सुरुवात माझ्या आजोबांनी लिहिलेल्या एका भजनाने करते.

सगुण निर्गुणा मायाधीशा
ब्रह्माविष्णु महेश परेशा |
दुष्ट वृत्तींचा करुनि विनाश
शांतिसौख्य देई जगतास ||

हे आणि इतर कित्येक भजने, आर्या, साक्या, दिंड्या, पदे, इत्यादी ऐकता ऐकताच मी लहानाची मोठी झाले. कवितेशी माझा पहिला परिचय माझ्या अप्पा आजोबांमुळेच, ज्येष्ठ कीर्तनकार वासुदेव कोल्हटकर ह्यांच्यामुळेच, झाला. दुर्दैवाने मी जन्माला येण्याअगोदरच आजोबा वारले. पण त्यांनी रचलेल्या शेकडो कविता आई बाबांमुळे लहानपणीच कानावर पडल्या. अप्पा आजोबांच्या कीर्तनांविषयी आज काही लिहिणार नाही. त्या विषयाचा अवाका फारच मोठा आहे. पण कीर्तनाव्यतिरिक्त ते फार मोठे लेखक, कवि आणि आयुर्वेदाचार्य होते. रोजच्या कीर्तनाला रोज नवी कविता ते स्वत: करत असत. अगदी लीलया. अभंग भारत, अभंग भागवत, कीर्तनकला आणि शास्त्र, अभंग योगवासिष्ठ, इत्यादी विविध ग्रंथ त्यांनी लिहीले. त्यांच्या केवळ योगवासिष्ठ ग्रंथातच अभंगांची संख्या सुमारे २९०० इतकी आहे. त्यांची कविता अगदी सहज, सुंदर आणि मनाला भावेल अशी आहे. विद्वत्ता मोठी, त्यामुळे बरेचदा संस्कृतचा पगडाही त्यांच्या भाषाशैलीत जाणवतो. पण कविता मुख्यत्वे मराठमोळीच. आजोबांच्या कवितासमुद्रात आवडत्या कविता शोधण्याचे काम खूपच कठीण, किंबहुना अशक्य आहे. पण उदाहरणादाखल आज मी त्यांनी लिहिलेला एक पोवाडा आणि एक पद सादर करणार आहे.

१. तानाजीचे वर्णन

तानाजी मोठा बलवान | धिप्पाड मान
विस्तीर्ण भाळ | स्वरूप विक्राळ हा जी जी जी ||१||
दंडासारख्या मिशा गुलढब्बु | त्यावरी लिंबु |
राहे सुढाळ | हृदय वीशाळ हा जी जी जी ||२||
हत्तीचे धरुनिया सुळे | उभा करि बळे |
वीर्य तेजाळ | कर्दनकाळ हा जी जी जी ||३||

लहानपणी हा पोवाडा म्हणताना आम्हा मुलांना फार मजा यायची. त्यावेळेस मला "गुलढब्बु" शब्दाने खूप हसू यायचे. हा शब्द मी आजतागायत इतरत्र कुठेच पाहिला नाही. तो शब्द आजोबांनीच शोधला की काय, काय माहीत? तसेच पोवाड्यात "जी, जी, जी " म्हणतात त्याचीही मला गंमत वाटायची. आणि मिशीवर लिंबू ठेवता येईल एवढी मिशी कशी दिसत असेल ह्याचे चित्र मी मनात रंगवी. मला आठवते, माझी बहीण कल्याणी हिने हा पोवाडा शाळेत सुंदरपणे गायला होता. तेंव्हा तिच्या काही मैत्रिणी नुसते "जी जी जी" मागे उभे राहून म्हणत होत्या.

२. दुसरी एक अगदी वेगळ्या विषयावरची कविता
हे पद त्यांच्या "राजा गोपीचंद" ह्या आख्यानातले. गोपीचंद हा भारताच्या पूर्वदिशेस असलेल्या गौडबंगाल प्रदेशाचा राजा. वडील (त्रिलोचन) लहानपणीच गेल्याने गोपीचंदाला बालपणीच राज्यकारभार करावा लागला. गोपीचंद राजा मोठा रसिक. त्याचे स्नानही मोठे थाटामाटात दासींकडून होत असे. ते पहाताना एकदा त्याच्या आईच्या, म्हणजे मैनावतीच्या, डोळ्यात एकदम पाणी आले. प्रथम आपल्या मुलाला पाहून तिला आपल्या दिवंगत पतीची आठवण आली आणि आपल्या पुत्राचे थाटामाटाचे स्नान बघून आपला मुलगा केवळ संसारातच गुरफटून गेला तर त्याला संसाराची क्षणिकता कळेल का नाही, असे भय तिला वाटले. त्या प्रसंगी ती गोपीचंदाला म्हणाली :

जल बुदबुदसम प्रपंच क्षणिक बालका |
लुकुलुकु करिताचि गळुनि जाय तारका ||
कमलदलावरिल सलिल तरल ज्यापरी |
जीवित मजलागी दिसे क्षणिक त्यापरी ||
अनुभव तुजलागी अजुन हा न येई का |
लुकुलुकु करिताचि गळुनि जाय तारका ||१||
बाळ तुझे तात उभे पुढती राहिले |
पाहुनि तव कांति मनी स्मरण जाहले ||
सुंदर तनु धगमग करि लोम पेटले |
मम सन्मुख प्रबळ नृपति धुळीस मिसळले ||
अनुभव तुजलागी अजुन हा न येई का |
लुकुलुकु करिताचि गळुनि जाय तारका ||२||

अशाच नानाविध विषयांवर आजोबांच्या हजारो, लाखो कविता.आजोबांच्या स्मृतीस विनम्र वंदन करून पुढील भागात बाबांनी केलेली एक कविता सादर करेन.

-रत्नधा