Nov 30, 2017

चार दिवस चार कविता- भाग २

हिमानी आणि अनुजा ह्या नात्याला जरी चुलत बहिणी असल्या तरी सख्ख्याच आणि सख्याच ! त्या प्रभात रोडला रहायला आल्यापासून तर आमचे जाणेयेणे रोजचेच झाले. वयाने सर्वात मोठी मी, मग हिमानी, अनुजा आणि शेंडेफळ वरदा. सर्वांचा स्वभाव, कार्यक्षेत्र अगदी वेगळं वेगळं. पण मला वाटते, कॉमन गोष्ट ही की आम्ही सगळ्या तितक्याच "crazy" आहोत. आमच्यापैकी काहींना हसता हसता रडू येते आणि रडता रडता हसू ! आज चौघी चार दिशांना असू. कदाचित् एकमेकांच्या सगळ्या गोष्टी एकमेकींना माहीतही नसतील. पण आम्हाला त्याची पर्वा नाही कारण त्या सर्व गोष्टींच्या पलीकडे आम्ही एकमेकींना ओळखतो. गोष्टी काय येतील जातील, पण आमच्या नात्यातला गोडवा तसाच राहील.

बहिणी माझ्या जीवाभावाच्या
मैत्रिणी सुंदर सुखदु:खाच्या
हाकेविनाही धावुनी येणा-या
हवेनको ते समजुनी घेणा-या
बालपणीचा काळ सुखाचा
गोड बहिणींच्या निखळ मैत्रीचा

जसे आम्हाला आमचे नाते जवळचे, तसेच सर्व काका-आत्यांनाही सगळे जवळचे. माझ्या बाबांना माझी बहुतांशी चुलत भावंडे "बाबा" अशीच हाक मारतात आणि हिमानीच्या बापूंना मीही "बापू काका" अशीच हाक मारते. आणि बापूंनी शब्दांत जरी मान्य केले नाही तरी मला माहीत आहे की मी त्यांची "लाडकी पुतणी" आहे. पुरावा कशाला पाहिजे ? मी दरवेळी पुण्यातून कॅनडात निघताना, माझा निरोप घेताना त्यांच्या डोळ्यातील अश्रू मी पाहिले आहेत. दरवेळेसच काय ते अश्रू डोळ्यांत धूळ गेल्याने आले नव्हते, होय ना बापू ? शास्त्रीय संगीत आणि लिखाण ह्यांचे मला थोडेफार प्रेम असल्याने बापूंचे आणि माझे एक वेगळे नाते आहे, असे मला वाटते.
बाबांनाही सर्व पुतणे-पुतण्या मुला-मुलींसारख्याच. घरांतल्या मंगल कार्यांत, उदाहरणार्थ, लग्ने, डोहाळजेवणे, बारशी, मुंजी, ह्यांच्यात बाबांनी कौतुकानी पुष्कळांसाठी कविता केल्या. मंगलाष्टके, अंगाईगीते अनेकदा रचली गेली. आजोबांप्रमाणे बाबाही कीर्तनकार आहेत, आणि त्यांनीही कीर्तनासाठी पुष्कळ कविता आजवर केल्या.
आज मी तुम्हाला तीन कविता सादर करणार आहे. पहिली बाबांची, दुसरी आईची आणि तिसरी माझी. ह्या तिन्ही कविता अगदी वेगवेगळ्या विषयांवर आहेत.

कविता १. ही कविता बाबांनी हिमानीच्या बारशाच्या वेळी लिहीलेले एक गोड अंगाईगीत आहे. हिमानी जेंव्हा "चंद्रवदन पाडस" होती तेंव्हा मी फक्त एकच वर्षाची असल्याने त्यावेळचे ते गोंडस बाळ मला आज आठवत नाही. तरी हे पाळणागीत मात्र कोल्हटकरांच्या व इतर पुष्कळ बाळांसाठी नंतर बरेचदा गाईले गेले.

अंगाईगीत

हे चंद्रवदन पाडसा नीज घे चांदण्यातल्या सशा ||

दिनराज घरी परतला पाखरे जाती कोटरा
किलबिलाट मंदावला चांदण्या नभा बिलगल्या
तो रक्तरंग लोपला पसरिते राज्य आपुले निशा ||१||

तृणबाळ वनी पहुडले अरविंद पापण्या मिटे
तारांगण फुलुनी उठे चंद्रबिंब आल्हाद ते
तो रत्नखचित पाळणा झुलवितो विश्वदेव राजसा ||२||

हे गाल खोब-यापरी नक्षत्रवरी जांभुळी
गाभुळल्या ओठावरी कुतुहली अंगुली न धरी
टकटका बघोनी तुला होतसे जीव कसा कसनुसा ||३||

मऊमऊ पाय पसरुनी अवनीच्या अंकावरी
तृणबाळ पहा गोजिरी द्वंद्वहीन निद्रा वरी
अंगाई गीत सागरा गाऊनी जोजवी या पाखरा ||४||

तो पूर्वज बलतपनिधि प्रपिताही तेजोनिधि
तो तात पहा वात्सल्ये तुजसाठी श्रमतो किती
हे कौशिकतपकौमुदा अर्थ दे आप्तवृंद आशिषा ||५||

हे गंध नवे तुज जरी क्षणभरी दूर त्या करी
मखमली जादुच्या उरी लवलवते हिरवे जरी
सांभाळी तूचि तुला थोपवी नव्या जगाची नशा ||६||

हे चंद्रवदन पाडसा नीज घे चांदण्यातल्या सशा ||

कवि: वामन कोल्हटकर (१९७८)

कविता २. खालील कवितेवरून माझी आई मनातून किती romantic होती हे कळेल. आई, ही कविता तुला सर्वांबरोबर शेअर करायची नसेल, तर मला खरंच माफ कर. पण आज "साहित्य" ह्या दृष्टीने मी ती शेअर करत आहे.आणि ती सर्वांना नक्कीच आवडेल. मला असे वाटते,आई बाबा आजकालच्या भाषेत सांगायचे तर "dating" करत होते तेंव्हाची म्हणजे सुमारे ५०-५५ वर्षांपूर्वीची ही कविता असावी. ह्या कवितेचे शेवटचे कडवे मला विशेष आवडते.

शिकविलेस मजला 

शिकविलेस तूं मजला
अस्फुटशा ओठांतून
गीत कसे गुंफावे
मोहकशा शब्दांतून ||१||

शिकविलेस तू मजला
धुंद, गूढ स्पर्शातून
गंध कसा बोलांनो
आणावा हृदयांतून ||२||

शिकविलेस रंगांतून
विश्व नवे उजळाया
अंतरीची आंच पुरी
आर्त स्वरी ओताया ||३||

शिकविलेस अर्पाया
जीवन प्रीतीस्तव
रम्य चांदण्यात, अहा
विसराया देहभाव ! ||४||

शिकविलेस हे सारें
शिकविलें न एक तूं
जीव कसा जगवावा
तुजवांचून, तुजवांचून ! ||५||

-कवयित्री: द्योतना कोल्हटकर

कविता ३. कविता करण्याच्या प्रांतात मी नवशिकी आहे. सुमारे वर्षापूर्वीपासून हा छंद जडत आहे. त्यामुळे माझ्या कवितेला आजोबा, आई आणि बाबा ह्यांसारख्या सराईत मंडळींच्या कवितांची सर येणार नाही. तरीही प्रयत्न केला आहे एवढेच ! आई गेल्यानंतर सुमारे २-३ महिन्यांनी, तेंव्हाच्या मानसिकतेत ही कविता लिहिली गेली.

आयुष्याची गाडी

झुकुझुकु जाई,आयुष्याची गाडी
मला न ठावे कुठे वळण घेई
क्षणी इथे, क्षणी तिथे मारी उडी
सुखदु:खाच्या रुळांवर परिक्रमा करी

अरे पहा ते डोंगर, अहा पहा ती नदी
खिडकीतुनी दृष्ये सारी सुंदर दिसती
नका पडु मोही, रूपे क्षणिक असती
क्षणार्धात् पहा कशी लुप्त ती होती

आगगाडीत माझ्या बहुत प्रवाशी
इच्छुकनिरीच्छुक सारे यात्रा करी
कुणा न ठावे कुणी कुठुनी येई
कुणा न ठावे कुणी कुठेही जाई

अज्ञानात कोणी आनंद घेई
ज्ञानी यात्रिकही ज्ञानाने मोही
योग्यायोग्याने कुणी संभ्रमात पडी
त्रयस्थयोग्याला मी कुठे शोधी

झुकुझुकु जाई, आयुष्याची गाडी
अचानक कशी बिघडुनि जाई
तिला लागे पळाया चैतन्यइंधन
आवडे तिला सुखदु:खाचे बंधन

काही रुळ सारे सुखाचे असती
गाडी तिथे कशी भरधाव जाई ?
जिथे रुळ मात्र दु:खाचे असती
तिथे गाडी कशी धिमीधिमी जाई ?

झुकुझुकु जाई, आयुष्याची गाडी
सुखदु:खाच्या रुळांवर विसावा घेई
बांधा बिस्तरा, आपुले स्थानक येई
आगगाडीस आता मी दुरूनच पाही

-रत्नधा (फेब्रुवारी २०१७)

उद्या परत भेटू!