Nov 30, 2017

चार दिवस चार कविता- भाग ३

जुनी पिढी- नवी पिढी

काही महिन्यांपूर्वी पुण्यात गेले होते तेंव्हा बाबांना कळलं की मला नुकताच कवितेचा छंद लागला आहे म्हणून. आणि त्यांनी चक्क मला कवितांची काही पुस्तके भेट म्हणून दिली. मला म्हणाले, "आठवणीतील कविता ह्या पुस्तकाचे चार भाग घे आणि इंदिरा संत ह्यांचेही काही काव्यसंग्रह घे. तुझ्या आईला इंदिरा संत फार आवडायच्या. इतरही जी पुस्तके तुला आवडतील ती घे ". वरील वाक्यात मी "चक्क " हा शब्द वापरला ह्याचे तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण तुमच्यापैकी जे कुणी लोक सिनिअर कोल्हटकरांना ओळखतात त्यांना साधारण कल्पना असेल की ह्या मंडळींना आपल्या मुलांना गिफ्ट देणे, शुभेच्छा देणे, त्यांच्याशी चार गोड शब्द बोलणे, त्यांची स्तुती करणे, त्यांना आय मिस यु, आय लव्ह यु, वगैरे तत्सम काहीसे बोलणे ह्यांची कडकडीत "allergy" आहे. म्हणजे ते पुस्तके वाचायला देतील पण त्याला "गिफ्ट" असे म्हणणार नाहीत. हे मी जे काय लिहीले आहे ते वाचल्यावर ही मंडळी म्हणतील, " त्यात काय म्हणायचंय ? हिचं उगाचच आपलं काहीतरी !"

वाढदिवसाला गिफ्ट वगैरे तर अशक्यच ! ती झाली परदेशी प्रथा. गोड गोड बोलणे, मिठी मारणे, कौतुक करणे, असे काही केले तर "मराठी संस्कृती" कशी काय जपली जाईल ? त्यातून मला माहीत असलेले थोर कोल्हटकर लोक हे रागीटपणा, दिलदारपणा, विक्षिप्तपणा, क्वचित् निर्दयता तर क्वचित् नको इतका हळवेपणा, चांगुलपणा, इत्यादी अनेक विरोधी गोष्टींचे अजीब समीकरण आहेत. तुमच्या पैकी कुणाला जर "थोर कोल्हटकर पुरुष" व्हायचे असेल तर खालील नियमांचे कटाक्षाने पालन करावे:

१. नियम को. ह्या नियमाचा गाभा "कोप" किंवा "क्रोध" ह्या शब्दात आहे. क्रोध हा वेळोवेळी प्रदर्शित करण्यासाठीच असतो. कधीही तो प्रकट करावा. त्यासाठी तिथी, वार, नक्षत्र, मुहूर्त, इत्यादी पाहू नये. त्याबाबत अजिबातच संकोच किंवा मनाची चलबिचल करू नये. प्रेम हे वाटले तर करावे. पण ते ओठांवर कधी आणू नये. शब्दांत मांडावेसे वाटले तर जास्तीत जास्त ते कवितेत लिहावे. किंवा शास्त्रीय संगीतात, कीर्तनात, व्याख्यानात सांगावे, ऐकावे. प्रेमासारखे क्षुद्र विषय बोलताना टाळावेत. कुणी त्याबाबत बोलत असेल तर तिथे दुर्लक्ष करावे. प्रेमाबाबत संदिग्ध असावे. इतरांची मने जाणून घ्यायच्या व्यर्थ भानगडीत पडू नये. मानापमान योग्य रीतीने सांभाळावा. म्हणजे, मान हा स्वत:चा राखावा आणि अपमान हा दुस-याचा करावा.

२. नियम ल्ह. बालपणच्या मित्राच्या कुठेतरी वेल्ह्याला रहाणा-या मामेभावाच्या शेजारणीच्या चुलतसासूच्या विहीणीचा सावत्र नातजावई शिंदे आळीत जरी ओझरता भेटला तरी त्याला आयत्या वेळी सहकुटुंब घरी जेवायला घेऊन यावे. आयुष्यात किमान चारपाचशे मित्र तरी करावेत (फेसबुक फ्रेंड नाहीत, खरेखुरे मित्र, की जे जेवायला कधीही घरी टपकू शकतील असे). ह्या आयत्या वेळी जेवायला येणा-या मंडळींची पूर्वसूचना बायकोला देण्याचे महापाप अजिबातच करू नये.

३. नियम ट. राग आल्यावर इतरांना टरफलासारखे वागवावे. लहरी असावे. चर्चेत नेहमीच पुढाकार घ्यावा. कथकली-कुचिपुडी नृत्य, न्यूटन, गाऊस, शंकराचार्य, कीर्तन, मल्याळी भाषा, संस्कृत, कुमार गंधर्व, भीमसेन जोशी, अरुणा ढेरे, विश्वामित्र, दधिची, इराणमधील अत्तरे, क्युबेक मधील फ्रेंच आणि इंग्रज ह्यांच्या लढाया, गणित आणि मुस्लीम धर्म ह्यांचा संबंध, साहित्य, कला, नारायण नागबली, त्रिपिंडी, विषय कोणताही असो. आपण चर्चेत नेहमीच अग्रेसर असावे. क्वचित् कधीतरी एखाद्या विषयाची माहिती नसेल तर जास्त जोरात बोलून बेधडकपणे आपले मत मांडावे. म्हणजे ते इतरांना खरे वाटते.

४. नियम क. ह्या नियमाचा गाभा "केकाटणे" ह्या शब्दात आहे. क्रोध प्रदर्शित करताना दिलखुलास केकाटावे. मुळमुळीतपणा अजिबात दर्शवू नये. मग समोरची व्यक्ती कल्हईवाला, भाजीवाला, बांधकामवाला, भंगारवाला, विद्यार्थी, सरकारी ऑफिसर, बॅंक manager, वॉचमन, मंत्री, संत्री, कोणीही असो. कुणाचेही (विशेषत: स्वत:च्या मुलांचे) कौतुक शक्यतो करू नये. आपल्या मुलांच्या शिक्षणात जास्त ढवळाढवळ करू नये. त्यांना जे जे व्हायचे आहे ते ते होऊ द्यावे. काही झाले तर झाले, नाहीतर नाही.

५. नियम र. रामनामाचा जप हवा असेल तर करावा. त्याची बळजबरी नाही. पण ह्या ना त्या मार्गे आत्मज्ञान प्राप्त करावे. भारतीय संस्कृती व इतर देशांच्या संस्कृत्याही जमतील तितक्या आपणच जपाव्यात. मुक्ती ही मिळवण्यासाठी असते. संसारचक्र हे त्यातून बाहेर पडण्यासाठी असते. तपश्चर्या केली नाही तर आपणा सर्वांना मुक्ती तरी कशी मिळेल ? सोमवारी जर ज्ञानेश्वरांची, तुकारामांची स्तुती केली तर मंगळवारी त्यांची निंदा करावी. कुठेही गुरफटून जाऊ नये. अगदी सोमवार-मंगळवारातही. त्यामुळे पुढच्या आठवड्यात मंगळवारी तुकारामांची स्तुती करावी व बुधवारी त्यांची निंदा करावी. अभ्यास मात्र करावा. नाही तर ईश्वरतत्त्व कसे काय कळेल ? ब्रह्म कोण जाणून घेईल ? अफाट वाचन करावे. मोठमोठे विद्वान, पंडीत ह्या लोकांशी मैत्री ठेवावी.

वरील को,ल्ह, ट, क आणि र नावाचे पाच नियम जो भक्तिभावे हररोज नेटाने आचरणात आणेल, त्याला जलदच "कोल्हटकरत्व" किंवा "कोल्हटकर पद" प्राप्त होईल. आणि हे गुण तुमच्यात जर आधीच असतील, तर त्वरित आपले आडनाव बदलून "कोल्हटकर" असे ठेवावे.

असो. थट्टा पुरे.

गोड शब्द न वापरण्यात मराठी माणसाचा दोष जास्त नसावा. मराठी भाषेतच ह्या गोड गोड शब्दांची, रीतीरिवाजांची कमतरता असेल. ह्या G-vitamin deficiency (गोड शब्दांची कमतरता) मुळेच मी ५-६ वर्षांची असतानाच "मुग्धा गोडबोले" नावाची एक गोड मैत्रीण केली. त्यावेळी गोड शब्दांची तीव्र गरज असल्याने मला "मारणे", "कुदळे", "कानशिले", "धोपटकर", "जमदग्नि", "दुर्वास", इत्यादी आडनावांच्या मैत्रिणी करणे शक्यच नव्हते. कुठूनतरी चार प्रेमळ शब्द तातडीने मिळवायचे होते. प्रश्न जीवनमरणाचा होता. त्यामुळेच "गोडबोले " आडनाव म्हणल्यावर एक गोड गुलाबी आशा वाटू लागली. जणू वाळवंटातले oasis सापडले. तशी मुग्धा खूप गोड गोड वागलीही. अजूनही वागते. पण आता समस्त झी मराठी टी.व्ही. मालिकांच्या श्रोत्यांना मंत्रमुग्ध करण्यात ती व्यस्त असते. तिच्यावर आता फारच मोठी जबाबदारी आहे. तरी अजूनही स्वप्नात येऊन मिठीच काय मारून जाते आणि गोड गोड काय बोलते. दूर दूर देशीही इतरांच्या स्वप्नात भल्या पहाटे बेधडक जाण्याची कोणती दिव्य शक्ती तिच्यात आहे काय माहीत ! कसं गं जमतं मुग्धा हे तुला ?

आमच्या बाबांचे सांगायचे झाले तर त्यांना कोणीही फोन केला तर कधीतरी "नमस्कार" म्हणतील, पण इतर काही वेळी एकदम जोराने "बोला !" असे ओरडतील. मग फोन करणा-यालाच बोलू की नको, आत्ता बोलू की नंतर बोलू, नक्की काय बरं बोलू, मला खरंच काही महत्वाचे बोलायचे होते का, अशा अनेक शंकाकुशंका मनात येऊ लागतील. फोन करणारा जर गुळमुळीत असेल तर घाबरून फोन ठेवूनच देईल. "बाबा तुमची आठवण आली," असे काहीसे त्यांना म्हणाले तर कधीकधी नुसते "हुं" असे म्हणतील. नुसत्या "हुं" चा अर्थ मला कधीच कळत नाही. त्यासाठी त्या व्यक्तीला प्रत्यक्षात पहावे लागते. "हुं" करताना समोरच्याच्या चेह-यावर स्मितरेषा असेल तर आपण बोललेले म्हणणे आवडले, असे समजायचे नाहीतर "हुं" चा अर्थ दरवेळी बदलतो. (काही "हुं" चे अर्थ खालीलप्रमाणे: अगं बाई बास कर आता, मग मी काय करू ?, काय माहीत ?, चालायचंच, असं का?, जाऊदेत, गप्प बस, आवरा आता, ताबा ठेव स्वत:वर, ...ही यादी फार मोठी आहे). "हुं" चा अर्थ फोनवरच्या बोलण्यात कधीच पडताळून पहाता येणार नाही. "हुं" ची भाषा चायनीज भाषांपेक्षा अवघड आहे. प्रत्येक माणसाच्या प्रत्येक "हुं" चा प्रत्येक अर्थ वेगळा असतो, हे मी का तुम्हाला सांगायला हवे ?

त्यातून चेह-यावरूनही "हुं" चा अर्थ समजेलच असे नाही. काही लोकांच्या चेह-यावर सारखेच हास्य असते. उदाहरणार्थ माझ्या बाबांचा लहानपणचा एक मित्र. अगदी घरच्यासारखाच. त्याला आपण किशोर काका म्हणूयात. (काकाचे नाव ह्या लेखासाठी बदलले आहे.) तर हा किशोर काका सततच हसतो. प्रसंग बरावाईट कसाही असो, तो हसतोच ! मग त्याच्या "हुं" चे अर्थ कसे कळणार ? त्याला मी कसे समजून घ्यायचे? तो कायमच आनंदीच असतो का ? असे कसे शक्य आहे ? का तो सुखदु:खाच्या पलीकडे गेला आहे ? का हसणे त्यांच्या खानदानातच अनुवंशिक आहे ? का हसण्याचा अर्थ कधीकधी रडणे असाही असतो ? का त्याला सतत ब्रह्मानंद होत असतो किंवा त्याला "कोsहम् ? सोsहम् !" ची अनुभूती सततच येत असते ? का तो स्थितप्रज्ञ असतो ? बघा ना, त्याच्या सततच्या हसण्याने मला कितीतरी प्रश्न पडले आहेत. त्याला कसे वाटते, की काही वाटतच नाही, की काहीतरी वाटण्यासाठी त्याच्याकडे वेळच नाहीये ? किशोर काका, तुला मी कसे काय समजून घ्यायचे रे ?

आमची आई पण फार काही वेगळी नव्हती. मला विचाराल तर बाबा आईपेक्षा फारच प्रेमळ आहेत. कितीतरी वेळा आईला मी सांगायचे की आई, मला पत्र, इमेल लिहिताना पत्राची सुरुवात "प्रिय रत्नधा " किंवा "लाडक्या रत्नधे" अशी काहीतरी प्रेमळपणे करत जा. आणि पत्राच्या शेवटी मिस यु, लव्ह यु किंवा रत्नधा तुझी फार आठवण येते असे कधी कधी म्हणलेस तरी चालेल. असे काहीसे सुचवले की ती नुसती हसायची किंवा "हुं" ची भाषा वापरायची. पुढची इमेल आली की नुसती 'रत्नधा' अशीच सुरुवात व्हायची. प्रिय वगैरे आधी काही नाही. मग आठ इमेल मध्ये एकदा कधीतरी एकदा प्रिय रत्नधा म्हणून जायची.

असो. थोडक्यात मला असे म्हणायचे आहे, की मनातले भाव कधी ओठांवर आलेच नाहीत तर ते कसे काय समजणार ? काही भाषांमध्ये जशी काही अक्षरे silent असतात तसे मराठी भाषेत काही भाव silent असतात, असे समजायचे का ? ह्या काही मराठी मंडळींना चार गोड शब्द वापरायची कसली एवढी भीती वाटते काय माहीत? ते शब्द त्यांना सुचतच नाहीत का त्यांना त्यांची गरजच वाटत नाही का ते बोलायची लाज किंवा भीती वाटते, किंवा त्यात कमीपणा वाटतो, ह्यापैकी काय खरे आहे मला काहीच माहीत नाही.

मी मात्र कट्टर मराठी-संस्कृत वातावरणात वाढले तरी मला गोड शब्द बोलता येतात आणि ऐकायलाही आवडतात. म्हणूनच की काय, एक दिवस देवाला माझी दया आली असावी. त्यामुळेच गेली अनेक वर्षे मी कॅनडात जिथे केवळ फ्रेंच बोलले जाते त्या क्युबेक भागात रहाते. ह्या फ्रेंच भाषेची माझी ओळख झाली आणि खूप मस्त वाटले. romantic होतेच पण ते भाषेत व्यक्त करण्याची संधीही मिळाली. ज्याला प्रेम करता येते त्याला फ्रेंच भाषा लवकर शिकता येते, असे मला वाटते. फ्रेंच भाषा खूप मधुर. गोड गोड वाक्प्रचारांची त्यात रेलचेलच आहे ! एखाद्याचे म्हणणे ऐकतच बसावेसे वाटते. अगदी बस ड्रायव्हर पण रोज आपण बसमधून उतरताना "Merci, bonne fin de soirée, à demain" (धन्यवाद, तुमची उर्वरित संध्याकाळ सुखाची जावो. उद्या भेटू) असे दोन सेकंदात प्रत्येकाला गोंडसपणे बोलतो. अशी ही गोड गोड भाषा विशेषत: फ्रांस मध्ये असाल तर ऐकतच रहाविशी वाटते. आपण पाच गोड शब्द बोललो तर फ्रेंच मनुष्य पंधरा गोड शब्द बोलेल. त्यामुळे romantic, प्रेमळ, expressive असाल तर तुमचा अपेक्षाभंगच होणार नाही. तोटा एवढाच होतो की कधीकधी ह्या गोड गोड शब्दांच्या देवाणघेवाणीत मूळ मुद्दाच बोलायचा रहातो, किंवा विसरून जातो. जसे एखाद्या सुंदर युवतीला बघितल्यावर मागचे पुढचे काहीच आठवत नाही तसेच !

माझ्या प्रिय मित्रमैत्रीणींनो, मला सांगा, नवीन गोड गोड वाक्ये मराठीत निर्माण करण्याची आता गरज आहे असे तुम्हाला वाटते का? मला तरी तसे वाटते, कारण नवीन पिढी जुन्या पिढीपेक्षा वरवर तरी प्रेमळ झाली आहे. भावना प्रकट करायला नवीन पिढीला जास्त आवडते असे मला वाटते. अर्थात् इंग्लिश किंवा इतर भाषांतील वाक्यांचे शब्दश: भाषांतर करून वापरले तर हसायलाच येते. उदाहरणार्थ खालील इंग्लिश प्रेमळ वाक्यांना पर्यायी मराठी वाक्ये कोणती आहेत की जी आपल्याला अर्थ आणि भाव न बदलता, न हसता, वापरता येतील ?

I love you with all my heart = ?
Love at first sight = ?
Hugs and kisses = ?
I am so sorry = ?
Excuse me = ?
Pardon me = ?

"Excuse me" वरून एक किस्सा आठवला तो सांगून माझी आजची बडबड आटोपती घेते. माझी भाची सुमेधा ४-५ वर्षांची असताना एकदा मी तिला विचारले होते, "सुमेधा, excuse me चा नक्की अर्थ काय गं?" त्यावेळेस तिने लगेच उत्तर दिले: "excuse me" म्हणजे "बाजूला व्हा, बाजूला सरका".
हा किस्सा नंतर काही वर्षांनी मी मायकलला (माझ्या नव-याला) सांगत होते. मायकल अमेरिकन आहे आणि त्याला मराठी येत नाही. त्यामुळे त्यानी मला सुमेधाच्या "बाजूला व्हा, बाजूला सरका" चे इंग्लिशमध्ये भाषांतर करायला सांगितले. तर ते मी "get out of my way" असे केले, तर त्यावर तो एवढा हसला. तेंव्हापासून तो कॅनडात सर्वांना मजेने सांगतो की मराठीत "excuse me" च्या ऐवजी "get out of my way" अशा अर्थाचा वाक्प्रचार वापरतात. असो, एकदा केलेल्या भाषांतराचे परत मूळ भाषेत भाषांतर करताना माझी काय त्रेधातिरपीट होते ते त्याला कसे समजणार ?

-रत्नधा

टीप: सदर लेखात कुणाची वैयक्तिक थट्टामस्करी केली गेली असेल तर ती केवळ विनोदबुद्धीने समजून घ्यावी. "को" आडनावाच्या व्यक्तींनी कृपया क्रोध करू नये. लोभ असावा, ही नम्र विनंती.

कविता १ : ये उदयाला नवी पिढी

गतकाळाची होळी झाली, धरा उद्याची उंच गुढी
पुराण तुमचे तुमच्यापाशी, ये उदयाला नवी पिढी ॥
ही वडिलांची वाडी तुमची तुम्हास ती लखलाभ असो
खुशाल फुटक्या बुरुजांवरती पणजोबांचे भूत वसो
चंद्रावरती महाल बांधू, नको आम्हाला जीर्ण गढी ॥१॥

देव्हाऱ्यातील गंधफुलांतच झाकून ठेवा ती पोथी
अशी बुद्धीची भूक लागता कशी पुरेल अम्हा बोथी
रविबिंबाच्या घासासंगे हवी, कुणाला शिळी कढी? ॥२॥

शेषफणेवर पृथ्वी डोले! मेरूवरती सूर्य फिरे!
स्वर्गामध्ये इंद्र नांदतो! चंद्र राहूच्या मुखी शिरे!
काय अहाहा बालकथा या, एकावरती एक कडी ॥३॥

दहा दिशांतून अवकाशातून विमान अमुचे भिरभिरते
अणूरेणूंचे ग्रहगोलांचे रहस्य सारे उलगडते
नव्या जगाचे नायक आम्ही, तुम्ही पुजावी जुनी मढी ॥४॥
कवि :वसंत बापट

कविता २ : नवे जुने

'नवीन काही गा हो आता
जुने-जुन्याचे चर्वण सरुद्या
प्रतिभेची पाखरे आपुल्या
नव्या नभामधुनी भिरभिरुद्या !

ती कमले ती, त्याच चांदण्या
तेच चांदणे, तोच सुधाकर
प्रेम तेच ते, त्या नवयुवती
ती कुसुमे अन् तो कुसुमाकर !

युगायुगांतुन घासत घोटत
टाकारीत आकारित बसली
कविकलमांची अफाट सेना
काव्यमूर्ति त्या जीर्णामधली ! '

प्रिय रसिका, हे खरे तुझे मत
मीहि असे जीर्णाचा वैरी
परि काळाच्या अतीत आहे
अनाद्यंत ही दौलत सारी !

प्रमदेच्या मधु अधरावरचे
ललित लालसर ते आमंत्रण,
चंद्र पुनेचा धरतीभवती
करितो जी स्वप्नांची गुंफण,

वैशाखांतिल पहाटवेळी
कूजन जे तीमिरांतुन वाहे,
सुगंध-सुंदरता सुमानांतिल
अथांगता जी गगनी आहे,

सौंदर्ये ही होतिल जेंव्हा
नीरस आणि असुंदर सखया,
त्याच क्षणी या संसारातिल
कविता अवधी जाईल विलया !

कवि : कुसुमाग्रज (१९४८)

उद्या भेटूच परत !

-रत्नधा