Dec 21, 2019

गोष्ट एका पतिव्रतेची


नको पाप माथी माझ्या तुला टाकल्याचे
    नको दु:ख अंत:करणी तुला सोडल्याचे

साथ तुझी देता देता बहु वर्ष झाली
   ग्रीष्म शरद सरता सरता वृद्ध तनु झाली 
हवे नको देता तुजला हरवले मला मी 
    स्वप्न तुझे माझे म्हणुनी गमवले मला मी
म्हणती मूर्ख कोणी मजला पतिव्रता कोणी

एक वेड पतिधर्माचे एक ध्येय पतिसेवेचे
    लाड तुझे करता करता भ्रष्टमती झाले
एक रात्र पाहून तुजला परस्त्री सवेही
    धजवले ना दुबळी मी, ना दिली सोडचिठ्ठी 
म्हणती मूर्ख कोणी मजला पतिव्रता कोणी

नको पाप माथी माझ्या तुला टाकल्याचे
    नको दु:ख अंत:करणी तुला सोडल्याचे
उणेपुरे सारे आयु वाहिले तुला मी
     तुझ्या दीर्घ आयुसाठी वृक्ष पूजिला मी
म्हणती मूर्ख कोणी मजला पतिव्रता कोणी

         ***(डोळे उघडल्यानंतर )***

आज वाटे सोडून तुजला वृक्ष मी पूजावे
    गर्द दाट झाडीमध्ये गाढ झोपी जावे
एक रोप लावून पुढच्या पिढ्या मी जपाव्या 
    सृष्टीचक्र फिरण्यासाठी वृक्ष हाच त्राता !
म्हणती मूर्ख कोणी मजला वृक्षव्रता कोणी

नेत्र आज उघडले माझे जरि उशीर झाला
    पतिधर्म घेण्यापेक्षा वृक्षधर्म मोठा
एक वृक्ष देतो सर्वां दाट सावली ही
    वृक्षवाढ होण्यासाठी वृक्ष वाढवावा
म्हणती मूर्ख कोणी मजला वृक्षव्रता कोणी

नको पाप माथी माझ्या वृक्ष तोडल्याचे
    नको दु:ख अंत:करणी रान मोडल्याचे
उर्वरित सारे आयु वृक्षवर्धनास
    देईन मी माझ्या खुशीने रान वाढण्यास
म्हणती मूर्ख कोणी मजला वृक्षव्रता कोणी

नको पाप माथी माझ्या वृक्ष तोडल्याचे
    नको दु:ख अंत:करणी रान मोडल्याचे

No comments:

Post a Comment