Dec 7, 2019

सूर्याचे मनोगत

उंच उंच जाईन ढगांतून धुके पांघरून घेईन
पांढुरक्या दुलईच्या मागे जरा विसावा घेईन

कधी सकाळी झोप संपता हलके डोळे उघडीन
हळूहळू मग धुके सारूनी निवांत जागा होईन

सोनेरी किरणांनी न्हाऊन निळे वस्त्र लेवीन
नाष्ट्यासोबत पृथ्वीवरचे क्षुल्लक जीवन पाहीन

कुठे युद्ध तर कुठे सोहळे आनंदाचे भरते
कुठे प्रेम तर कुठे भांडणे उगा गळे कापणे

चार माणसे बरी पाहता हजार विकृत दिसती
ज्यांच्या हाती सारी सत्ता गर्वाने ते फुगती

अन्यायाचे चार दिशांना जहाल समुद्र दिसती
कोट्यावधी निष्पाप जीव त्या पाण्यामध्ये डुबती

हिंस्र श्वापदे बरी अशी ती क्रूर दुष्ट माणसे
स्वार्थापोटी करी जीवांचे हाल हाल चहुकडे

उंच उंच जाईन ढगांतून धुके पांघरून घेईन
थकलो जर जगण्याला तर मी सदा झोपी जाईन

No comments:

Post a Comment