Feb 19, 2019

देव आणि जावई

देव काळाकुट्ट चालतो - जावई गोरापानच लागतो. 
देव तान्हा, तरुण, म्हातारा चालतो - जावई मुलीपेक्षा मोठाच लागतो. 
देव लांब सोंड असलेला चालतो - जावई दीड इंची नाकाचाच लागतो. 
देव एक दात असलेला चालतो - जावई अठ्ठावीस ते बत्तीस दातांचाच लागतो. 

देव आभाळात, पाण्यात, देवळात, गुरुजींत, आईत, हत्तीत, नृत्यकलेत, मनात, दिव्यात, दगडात, कुठेही, कशातही, चालतो -जावई जमिनीवर आणि माणूसच लागतो. 
देव निर्गुण, निराकार, निळा, काळा, गोरा, कितीही तोंडे असलेला, लंगडा, कितीही हात पाय असलेला चालतो -जावई आकारबद्ध, एकतोंडी, दोन पायांचा, नाकी डोळी नीटस, देखणाच लागतो. 

देव साधा गरीब असेल तर उत्तम - जावई चलाख श्रीमंत लागतो. 
देव लठ्ठ ढेरीचा चालतो  - जावई लठ्ठ पगाराचा लागतो. 
देव येशू, महम्मद, मेरी, एल, शादाई, इत्यादी, मोजकी नावे वगळता कोणत्याही नावाचा चालतो
-जावई अर्थपूर्ण नावाचा आणि मुलीच्या नावाला साजेसा लागतो. 
देवाला आडनाव नसते - पण आडनाव नसलेला मनुष्य जावई होऊच शकत नाही. 

देव एक, तेहतीस कोटी, अनंत, कितीही संख्येचा चालतो - जावई एका वेळी एकच लागतो. 
देव स्त्री, पुरुष, प्राणी, झाड, नदी, पर्वत, नाग, अतिथी चालतो - जावई पुरुषच लागतो. 
देवावर हळदीकुंकवाचा वर्षाव केला तरी चालते - जावयाला कुंकवाचा जास्तीत जास्त एक टिळा चालतो. 
देवाला सोवळे धोतर नेसायचे असते - जावयाला जीन्स द्यायची असते. 

देवाने मानेभोवती नाग गुंडाळला किंवा कवट्यांची माळ घातली तरी चालते
- जावयाने तसे काही केले तर पोलिसांना सांगण्यात येते. 
देवाने लांब लांब जटा वाढवल्या तरी चालते -जावयाने केस वाढवले तर ब्युटी पार्लरचा पत्ता देण्यात येतो. 
देव शंकराप्रमाणे घरजावई बनू शकतो - जावई घरजावई झाला तर हेटाळणी होते.
देवाला अरेतुरे केले तर चालते - जावयाला अहोजाहो करावे लागते. 

देव दरवर्षी चातुर्मासात भरपूर झोपतो - जावई एखाद् दिवस नऊ वाजता उठला तरी निंदा होते. 
देव नंदीवर बसून आला तरी चालते - जावयाकडे मात्र महागडी कारच लागते. 
देवाने एकवीस मोदक खाल्ले तरी चालते - जावयाने नऊ मोदक खाल्ले तरी भुवई उंच होते. 
देव एकपत्नी व्रत अवलंबलेला, पुष्कळ गर्लफ्रेंड असलेला, संन्याशी, बायकोला सोडून जाणारा चालतो
-जावई एकपत्नी व्रत घेणारा, बायकोला सोडून न जाणारा लागतो. 

देवाला जात नसते - जावयाची जात जाता जात नाही.  
देवाची आणि आपली पत्रिका जुळतेय की नाही कुणी बघत नाही
- पत्रिका तपासल्याशिवाय जावयाकडे कुणी ढुंकूनही बघत नाही. 
देव एरवी सर्वत्र असला तरी शक्यतो भारतातल्या आभाळात राहतो - जावई परदेशी राहणाराच लागतो.

अनुमान : देवाला एरवी काहीही करण्याची शक्ती असली तरी तो प्रयत्नांतीही जावई होऊ शकणार नाही. 

No comments:

Post a Comment