Dec 11, 1981

भरलेले आर्त मन

भरलेले आर्त मन आतां गोठुनिया गेले
विचारांचे गोल चक्र कसे थांबून बसले ||

शिणलेल्या या तनूला कोण आतां बोलावील?
ओल्या भावनांची सूक कोण पुन्हां ओलावील?

अस्मानाच्या पोकळीला आग लागली कोरडी
मऊमऊ रेशमाची वस्त्रे झाली गे नागडी ||

पाखरांचे प्रेमशब्द वाटू लागले प्रलाप
किती प्रेम दोहोंतले मोजमोजले...अमाप!

हांक तुझी ऐकली गं पहा किती ती अधीर
दमले गं पाय माझे कसें तोडू हे अंतर?

नाही राहवे डोळ्यांना पूर त्यांचा कसा पुसूं?
तुझ्या वियोगे या दिशा रडती गे मुसुमुसूं!

काही नाही गं आधार रहावत नाही आतां
अंध झालेल्या या मला कोण सांवरील आतां?

(१९६८)