Dec 11, 1978

दोहद (देवि विशाखे)


जयजयजय श्री अदितिवामना कुलदैवत वंदुनि तैसे
देवि विशाखे रुसू नको तू दोहद पुरवू तव कैसे ||

मंगल दिन अजि पातला असे देवि मंगला गौरिव्रत |
सुवासिनी किति कौतुक करिती पूजेसंग तव सुभट |
भोजन करितां बोलू नको परि जरि दोहदभोजन आज
लक्ष रामचे तव पानावर रुचेल त्याते ते तव काज ||१||

आनंदाच्या अमृतडोही आनंदरागिण्या किति फुलल्या |
सुखासीन सौरभामधुनिया आनंदक्षण स्मृति विणल्या |
योग्यवेळी त्या उमलुनि येतील भविष्यांत ‘आनंद विधान’
जपुनिजपुनि परि फुलवि मनाला बंधनांतली मुक्तिच छान ||२||

सद्भावाने प्रेमरसाचे संगोपन तूं बहु केले |
पुण्य पुरुष श्रीराम वामनही शुकव्यासांसी मनी ध्यावे |
स्मरुनी श्वशूरा करी मंगल घरी तव येई आज
पुरोत सगळे शुभसंकल्पही आशिष त्यांचे पुरविती काज ||३||