Dec 30, 1978

अंगाईगीत (हिमानीसाठी)

हे चंद्रवदन पाडसा नीज घे चांदण्यातल्या सशा ||

दिनराज घरीं परतला पाखरे जाती कोटरा
किलबिलाट मंदावला चांदण्या नभा बिलगल्या
तो रक्तरंग लोपला पसरिते राज्य आपुले निशा ||१||

तृणबाळ वनी पहुडले अरविंद पापण्या मिटे
तारांगण फुलुनी उठे चंद्रबिंब आल्हाद ते
तो रत्नखचित पाळणा झुलवितो विश्वदेव राजसा ||२||

हे गाल खोब-यापरी नक्षत्रवरी जांभुळी
गाभुळल्या ओठावरी कुतुहली अंगुली न धरी
टकटका बघोनी तुला होतसे जीव कसा कसनुसा ||३||

मऊमऊ पाय पसरुनी अवनीच्या अंकावरी
तृणबाळ पहा गोजिरी द्वंद्वहीन निद्रा वरी
अंगाई गीत सागरा गाऊनी जोजवी या पाखरा ||४||

तो पूर्वज बलतपनिधि प्रपिताही तेजोनिधि
तो तात पहा वात्सल्ये तुजसाठी श्रमतो किती
हे कौशिकतपकौमुदा अर्थ दे आप्तवृंद आशिषा ||५||

हे गंध नवे तुज जरी क्षणभरी दूर त्या करी
मख्मली जादुच्या उरी लवलवते हिरवे जरी
सांभाळी तूचि तुला थोपवी नव्या जगाची नशा ||६||

हे चंद्रवदन पाडसा नीज घे चांदण्यातल्या सशा ||