Jun 30, 2019

तुजवीण रजनी

निजली मैना निजला राघू
निजले वृक्ष नि वेली 
मंद झाली ज्योत समईची
निजला हरी मंदिरी

जड झालेले नयन दाटती
दिसे तुझी सावली
भास मनाला उगाच होई
भिववी रजनी काळी

निशिगंधाचा गंध पसरतो
मदनबाण दरवळतो
सुवास त्यांचा, गहिवर येतो
रात्रीच्या प्रहरात

मऊ बिछाना काट्यांसम रे
सर्वांगी टोचतो
निद्रादेवीचा शाप मला अन्
जिव्हारी लागतो

कुठे हरवशी सांग सख्या रे
गगनी का स्वर्गात?
तुजवीण रजनी साहेना मज
अडखळतो रे श्वास

No comments:

Post a Comment