Apr 30, 1987

कौशिकसाठी निन्नागीत

दुडुदुडु धांवताती निळ्या आकाशी चांदण्या |
त्यांच्या अनंत मार्गाच्या किती घेशील शोधाला |
नीज पापण्यांना आली नीज आतां माझ्या बाळा ||१||

पक्षी होते गातगात हंस होते न्हातन्हात |
परि काळोख्या रात्रीचा पंख कसा पसरला |
नीज पापण्यांना आली नीज आतां माझ्या बाळा ||२||

सागराच्या रे हिंदोळ्या शुभ्र ज्योत्स्नेला पीतात |
रुसलेला रात्रीराज गाल फुगोनी चालला |
नीज पापण्यांना आली नीज आतां माझ्या बाळा ||३||

रातकिड्यांचे तंबोरे कसे जुळुनी बसले |
आगगाडी शीळ घाली पळे धरोनि तालाला |
नीज पापण्यांना आली नीज आतां माझ्या बाळा ||४||

खेळखेळोनि भागल्या प्रेमप्रेमाने माखल्या |
ताई माई तुझ्या बघ कशा निन्नावल्या |
नीज पापण्यांना आली नीज आतां माझ्या बाळा ||५||

धावधावोनि दमले कामकामात थकले
जग सारे शांत फिरे चंद्र धरोनी माथ्याला
नीज पापण्यांना आली नीज आतां माझ्या बाळा ||६|| 
 
रंग डाळिंबी पाकळ्या काय सांगती तान्हुल्या |
उटी चंदनाची दिसे कशी खुलोनि माथ्याला |
नीज पापण्यांना आली नीज आतां माझ्या बाळा ||७||

लाडक्या रे वासुदेवा वाटे गोड पापा घ्यावा |
परी झोपशी म्हणोनि मनाने या ताबा केला |
नीज पापण्यांना आली नीज आतां माझ्या बाळा || ८||