Jun 9, 2020

सुविचार आणि मी


आमच्या सोसायटीच्या फलकावर रोज किमान एक तरी सुविचार अथवा म्हण सुवाच्य अक्षरात तुम्हाला वाचायला मिळेल. तो दिवस होता आशेच्या किरणांचा. मनास उभारी यावी असा. सकाळी सकाळीच एक पॉझिटिव्ह सुविचार फलकावर वाचला : “दुष्ट व्यक्तींच्या कृत्याने चांगल्या व्यक्तींचे नुकसान होत नाही.”
इतर काही वेळी असेच कित्येक सुंदर आशादायी विचार त्या फलकावर वाचायला मिळतात. उदाहरणार्थ :
“प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे.”
हाती घ्याल ते तडीस न्याल.”  
“आपला हात जगन्नाथ.”
“कर नाही त्याला डर कशाला?”
“चार दिवस सासूचे,चार दिवस सूनेचे.” 
“छ्डी लागे छमछ्म विद्या येई घमघम.”
“लाथ मारेन तिथे पाणी काढेन.”
अरे वा ! काय सुंदर विचार आहे हा-लाथ मारेन तिथे पाणी काढेन ! केवढा हा आत्मविश्वास ! असे काहीसे वाचले की आपोआप माझ्या अंगावर मूठभर मांस चढते. मी स्वकर्तृत्वावर फार हुरळून जातो. तर सांगायचा मुद्दा हा, की त्या दिवशी “दुष्ट व्यक्तींच्या कृत्याने चांगल्या व्यक्तींचे नुकसान होत नाही,” हा विचार वाचून पॉझिटिव्ह ऊर्जेने माझे अंग सळसळू लागले. ढगाळ दिवस असूनही आपण सोनेरी किरणांनी न्हातोय की काय असे वाटू लागले. रस्त्यांवरच्या कर्कश्श हॉर्नच्या धुमश्चक्रीतही एक गोड धून आहे की काय असे वाटू लागले. इकोनॉमिक्सचा एकच क्लास तो पणऑनलाईन शिकत असूनही आपण काही कालावधीतच एक नामांकित अर्थशास्त्रज्ञ सहज होऊ आणि सारे जग बदलून टाकू असे मला ठामपणे वाटू लागले. पण हा उत्साह, हा आनंद, आळवावरच्या पाण्याइतकाच टिकला. सिग्नलपाशी भूकेनी कासावीस झालेली फाटक्या कपड्यांतली पाच-सहा वर्षांची पोरे वातानुकुलित गाड्यांमधून टाईम पास म्हणून शॉपिंगला जाणा-या सुखवस्तू बायकांना गजरे विकताना दिसली तेंव्हाच लक्षात आले की दुष्ट व्यक्तींच्या (राज्यकर्त्यांच्या) कृत्याने चांगल्या व्यक्तींचेही (लहान मुलांचे) नक्कीच नुकसान होऊ शकते. असो. इतर पॉझिटिव्ह सुविचारांचा विचार करण्याआधीच माझा आत्मविश्वास पार डळमळून गेला होता. ती रात्र कशीबशी सरली आणि मग निराशेने मला घेरले.

दुस-या दिवशी सकाळी सकाळीच सोसायटीतल्या फलकावर वाचले: “नळी फुंकली सोनारे इकडून तिकडून गेले वारे.” आणि मग ह्यापूर्वी वाचलेले ह्यासारखेच कितीतरी निगेटिव्ह “सु”विचार आपसूक आठवले :
जित्याची खोड मेल्यावाचून जात नाही.”
“कुत्र्याचे शेपूट नळीत घातले तरी वाकडे ते वाकडेच.”
“आलीया भोगासी असावे सादर.”
“कडू कारले तुपात तळले साखरेत घोळले तरी ते कडू ते कडूच.”
“तेरड्याचा रंग तीन दिवस.”
“पालथ्या घड्यावर पाणी.”
“नावडतीचं मीठ आळणी.”
“शीतावरून भाताची परीक्षा.”
"भरवशाच्या म्हशीला टोणगा."
“कोल्हा काकडीला राजी.”
“थांबला तो संपला.”
अरेरेरे ! किती ती निगेटिव्हिटी ! कुणी हे “सु”विचार शोधले असतील देव जाणे ! पण आमच्या सोसायटीच्या फलकावर हे ही “सु”विचार वरचेवर सुवाच्य अक्षरात वाचायला मिळतात. अशा आणि तत्सम विचारांनी माझ्या अंगात निगेटिव्हिटी झुळझुळू लागते. लख्ख सूर्यप्रकाशाच्या दिवसावरही निराशेचे सावट पसरू लागते. जगाला आपला काहीच उपयोग होऊ शकणार नाही हे खात्रीपूर्वक वाटू लागते. इकोनॉमिक्सची एक कंसेप्ट कळली नव्हती ते आठवते. ती मला कधीच कळणार नाही ह्याची एव्हाना खात्री वाटत असते. कारण शेवटी “पालथ्या घड्यावर पाणी !” किंवा “नळी फुंकली सोनारे इकडून तिकडून गेले वारे,” हेच खरे !

दु:खी अंत:करणाने जड पावलांनी त्या दिवशी कामावरून मी घरी परतलो. शूज, सॉक्स इकडे तिकडे फेकले. बायकोने आवरलेल्या दिवाणखान्यात वस्तू इतस्तत: टाकून सोफ्यावर पडून चक्क घोरू लागलो. तोच तिच्या कर्कश्श आवाजाने जाग आली. बाईसाहेबांचा मूड आज रागावण्याचा होता. उगाचच कचकच भांडायला लागली. तिने नेमके कोणत्या सोसायटीतले सुविचार आज वाचले होते काय माहीत ?  मला वाटते, तिने आशावाद किंवा निराशावाद सोडून नुसते “वाद” ह्या विषयांतील म्हणी-सुविचार वाचले असावेत. उदाहरणार्थ  :
“कशात काय अन फाटक्यात पाय.”
“चोराच्या उलट्या बोंबा.”
“ज्याचं जळतं त्यालाच कळतं.”
“झाकली मूठ सव्वालाखाची.”
“ढवळ्याशेजारी बांधला पवळ्या, वाण नाही पण गुण लागला.”
तोंड दाबून बुक्क्यांचा मार.”
"उचलली जीभ लावली टाळ्याला."
“तुला नाही मला नाही घाल कुत्र्याला.”
"कोणाच्या गाई म्हशी आणि कोणला उठाबशी."
“दुस-याच्या डोळ्यातले कुसळ दिसते, पण स्वत:च्या डोळ्यातले मुसळ दिसत नाही.”  
कुठला मुद्दा कुठे घेऊन कोणत्या विषयावर सहजगत्या भांडावे हे आमच्या सौभाग्यवतीलाच ठाऊक !  खरं तर मी फरशीवर टाकलेले घामट मोजे हाच एक मुद्दा होता. पण “तुम्ही हेच करत नाही, तेच करत नाही, गेल्या वेळी  सुनयनेच्या साखरपुड्याला पण तुम्ही आला नव्हता इथपासून ते माझ्या माहेरच्या मंडळींची तुम्हाला किंमतच नाही, सगळी कामं मीच करते, मी काही तुमची नोकर नाही... इत्यादी, इत्यादी,अनेक  विषयांना तिने लीलया स्पर्श केला होता. आधीच खच्ची झालेले माझे मन अजून विषण्ण झाले. तिच्या खोट्यानाट्या आरोपांनी मी बधीर झालो. मनात सुविचार तर सोडाच, कोणतेच विचार येईनासे झाले. सुन्नपणे मी तिच्या दुर्गावताराकडे पाहू लागलो. त्यावेळेस मला तिच्या किंवा माझ्या डोळ्यांत कुसळ, मुसळ, ह्यांपैकी काहीच दिसत नव्हते. परंतु तिने पुडक्यात बांधून आणलेल्या “काटा किर्र” मधल्या मिसळीचा वास मात्र घमघमत होता. मी आलोच पटकन,” असे म्हणून, झटाझट जिने उतरून खाली गेलो. ओल्या फडक्याने सोसायटीचा फलक स्वच्छ पुसून त्यावर ठळक अक्षरात एक ठसठशीत सुविचार लिहीला : “ ऐकावे जनाचे करावे मनाचे.”

No comments:

Post a Comment