Jun 21, 2020

फेसबुकचे एक पान

एक मिक्स व्हेज लोणच्याची रेसिपी,
एक आडवेतिडवे झोपलेले मांजर,
एक आमरसाने चेहरा माखलेले बाळ,
कुठे ब्लॅक लाईव्हज् मॅटर--असे ओरडून सांगणा-या
अमेरिकेतल्या आंदोलनांचे व्हिडेओज्,
एक मोदींचे सात वर्षांपूर्वीचे मल्याळी भाषेत डब केलेले भाषण,
एखादी नैराश्याने आत्महत्या केलेल्या सिनेतरुणाची हृदयद्रावक कथा,
कुठे आर्मीतल्या जवानांना वाहिलेल्या श्रद्धांजलीची छायाचित्रे,
कुठे “चॅलेन्ज अ‍ॅक्सेप्टेड” म्हणत ठेवलेले विविध वयोगटातील महिलांचे पैठण्या घातलेले दागदागिन्यांनी नटलेले फोटो,
कुठे पोट खपाटीला गेलेल्या स्थलांतरित मजुरांच्या शोककथा,
कुठे करोनाग्रस्त पेशंटचे झालेले हालहाल,
कुठे नोकरी गेलेल्या तरुणांच्या कथा,
कुणाचातरी योगा क्लासमध्ये घातलेल्या शिर्षासनाचा फोटो,
एखादा ऑनलाईन जिमचा क्लास,
अमुक धर्म कसा श्रेष्ठ तमुक धर्म कसा वाईट ह्यावरची
उलट सुलट चर्चा, टीका, आरोप, प्रत्यारोप,
कुणाचेतरी झुमवर लग्न केल्याचे फोटो,
कुठे पूर, वादळ, टोळधाड झाल्याची बातमी,
कुठल्यातरी झाडावर रॉबिनने बांधलेल्या घरट्याची माहिती
आणि त्यातल्या निळया अंड्यांचे फोटो,
बारके बारके मिनीटभराचे नानाविध विषयांवरचे शंभर एक व्हिडीओ ,
कुठे धेडगुजरी मराठीतले साहित्य, कविता, चारोळी, पांचट विनोद,
कुठे राज्यकर्त्यांचा फालतू कारणासाठी उदोउदो
किंवा त्यांची बिनपाण्याने केलेली हजामत,
कुठे मोकळ्या आकाशाचे, कुठे निसर्गरम्य सूर्योदय-सूर्यास्ताचे,
कुणाच्या बागेतील झाडांचे, फुलांचे सुरेख फोटो,
कुठे सुगरणीचा खोपा, कुणाचे दोन मिनीटांचे शास्त्रीय संगीत,
कुठे झुणका भाकरीचा, टपरीवरील कटिंग चहाचा फोटो,
कुठे मित्रमैत्रीणींचे हादडतानाचे, फिरतानाचे, देशोदेशी काढलेले फोटो..
कुणाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी दिलेले शेकडो मेसेजेस्
आणि त्यानंतर“थॅन्क यू एव्हरीवन” म्हणून आलेली पोस्ट, बिलेटेड बर्थडे पोस्ट, लाईकला लाईक, लाईकच्या लाईकला लाईक, इमॉटिकॉन, चेहरे,चेहरे,चेहरे,....पोस्ट,पोस्ट,पोस्ट,...
……
फेसबुकवरच्या पानावरील अशा क्षणोक्षणी पब्लिश होणा-या,
लाईक मिळणा-या, कॉमेंटस् मिळणा-या, न मिळणा-या, संपूर्ण दुर्लक्षित केल्या गेलेल्या,फॉर्वर्ड केलेल्या असंबंधित पोस्टस् वरून पाच मिनीटे नजर फिरवून, कर्सर पुढे ढकलत ढकलत, इंटरनेटच्या भीतीदायक विळख्यात सापडलेली मी स्वत:ची एक पोस्ट ठेवून कुणी वाचतंय का असे भिकारड्यासारखे जेंव्हा चेक करत बसते तेंव्हा मलाच माझी कीव येते.
आणि ह्या असंबंधित घटनांच्या मागे लपलेली एक गोष्ट सहजासहजी लक्षात येते: माणसाचे एकाकीपण, कुठेतरी आपणही आहोत असे सांगण्याची धडपड कुठेही आणि कशातही असू शकते- एखाद्या पाककृतीत, एखाद्या कलाकृतीत, एखाद्या बाळाच्या फोटोत, एखाद्या टीकेत, एखाद्या लाईक मध्ये, एखाद्या सूर्योदयाच्या फोटोत,साईबाबांच्या आवडलेल्या एखाद्या प्रार्थनेत, किंबहुना फेसबुकच्या प्रत्येक पोस्टमधे !

No comments:

Post a Comment